सामान्य मुलांमध्ये रुजविणार इंग्रजी संभाषण कौशल्य 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

सामान्य मुलांमध्ये रुजविणार इंग्रजी संभाषण कौशल्य 

सामान्य मुलांमध्ये रुजविणार इंग्रजी संभाषण कौशल्य 

जळगाव : उच्च शिक्षण घेऊन विदेशात गेल्यानंतरही आपल्या भागाची ओढ आणि त्यासाठी काहीतरी करण्याची तन्मयता असणारे "एनआरआय' दुर्मिळच. मूळ जळगावच्या रोझमिन खिमनी या त्यापैकी एक. प्रभावी सार्वजनिक संभाषणात निपुण रोझमिन यांनी या संभाषणाचा प्रशिक्षण वर्ग अमेरिकेत त्या राहत असलेल्या ठिकाणी सुरू केलाच; परंतु, आता हाच उपक्रम जळगावातील सामान्य विद्यार्थ्यांसाठीही विनामूल्य राबविण्याचे त्यांनी ठरविलेय. 
जळगावातील रोझलॅन्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या रोझमिन या पती संतोष प्रधान यांच्यासह अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील टलाहौसी येथे गेल्या 25 वर्षांपासून वास्तव्यास आहेत. तत्पूर्वी त्यांनी पुण्यातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले. नंतर हैदराबाद येथून इंग्रजीतील पदव्युत्तर पदविका प्राप्त केली. 

संभाषणाचा अभ्यासक्रम 
प्रभावी इंग्रजी संभाषणावर त्यांनी संशोधन सुरु केली. याचदरम्यान अमेरिकेत त्यांनी लिट्‌लटन व डेन्व्हर कोलोरॅडो महाविद्यालयात फ्रेशमॅन लेव्हलपर्यंतचे इंग्रजी शिकविले. त्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक संभाषणाचा अभ्यासक्रम विकसित केला आहे. आणि या अभ्यासक्रमाद्वारेच गेल्या दहा वर्षांपासून त्या टलाहौसी येथे विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य "प्रभावी सार्वजनिक संभाषणा'चा वर्ग घेतात. रोझमिन यांच्या या सेवेत त्यांचे पती संतोष प्रधान, मुलगा सनूर, मुलगी सानिया तन्मयतेने सहभागी होतात. 

जळगावातही संभाषण कार्यशाळा 
मूळ जळगावच्या रहिवासी असल्याने रोझमिन यांनी या भागातील विद्यार्थ्यांमधील इंग्रजी संभाषणाची भीती दूर व्हावी म्हणून नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा जळगावातही विनामूल्य घेण्याचे त्यांनी ठरविले आहे. केवळ संभाषणच नव्हे तर विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य, शब्दसंग्रह सुधारुन सर्जनशील लेखनास मदत होईल, असाही त्यांचा प्रयत्न आहे. जळगावी 31 ऑक्‍टोबर व 1 नोव्हेंबरला रोझलॅन्ड इंग्लिश स्कूल येथे ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्यातील प्रवेशासाठी rosemeen.pradhan@gmail.com या ई-मेलवर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

आई "रोझलॅन्ड'च्या संस्थापक 
रोझमिन यांच्या आई दौलत सद्रुद्दीन खिमनी यांनी पती सद्रुद्दीन यांच्या सहकार्याने सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना परवडणारे इंग्रजी शिक्षण मिळावे म्हणून 1974मध्ये रोझलॅन्ड इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना केली. त्यांच्याच स्मृतिप्रीत्यर्थ रोझमिन हा उपक्रम राबवित आहेत. 

ही कार्यशाळा एक प्रयत्न व प्रयोग असून तो यशस्वी झाल्यास दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येईल. याच माध्यमातून भविष्यात "ना नफा- ना तोटा' तत्त्वावर कायमस्वरूपी उत्कृष्ट इंग्रजी संभाषण व सर्जनशील लेख वर्ग सुरू करण्यात येतील. 
- रोझमिन खिमनी- प्रधान 
टलाहौसी, फ्लोरिडा (अमेरिका) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgon news english sabhashan