चोरट्यांनी शाळेतील तिजोरीच केली लंपास 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

चोरट्यांनी शाळेतील तिजोरीच केली लंपास 

चोरट्यांनी शाळेतील तिजोरीच केली लंपास 

जळगाव : शिरसोली रस्त्यावरील एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या मागच्या दरवाजाने शाळेत प्रवेश करून चोरट्यांनी अध्यक्षांच्या दालनातील तिजोरी लंपास केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. चोरट्यांनी शाळेत चोरी करतानाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांकडून त्याचे फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. 
शिरसोली रस्त्यावर असलेल्या एल. एच. पाटील इंग्लिश स्कूल आहे. या स्कूलच्या मागील बाजूस असलेल्या गेटची काच तोडून मध्यरात्री एकच्या सुमारास चार चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधून शाळेत प्रवेश केला. त्यांनी शाळेतील प्राचार्य, अध्यक्ष यांच्यासह संपूर्ण शाळेत असलेल्या केबिनचे लॉक तोडून शोध घेतला. परंतु त्यांना त्याठिकाणी काहीच मिळून आले नाही. त्यानंतर चोरट्यांनी अध्यक्षांच्या दालनात प्रवेश केला. त्याठिकाणी चोरट्यांना तिजोरी दिसून आली. चोरट्यांनी लॉक न तोडता थेट तिजोरीच उचलून पळ काढला. या तिरोजीत 30 हजार रुपये रोख असल्याची माहिती समोर आली आहे. 

चोरट्यांचा 16 मिनिटे वावर 
चोरट्यांनी गुरुवारी (ता. 29) मध्यरात्री 1 वाजून 2 मिनिटांनी शाळेत प्रवेश केला. त्यानंतर तिजोरी घेऊन चोरटे 1 वाजून 18 मिनिटांनी शाळेतून बाहेर पडल्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरट्यांनी सुमारे 16 मिनिटे शाळेच्या परिसरात वावरत असल्याचे समोर आले आहे. 

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात 
चोरी झाल्याची माहिती शाळेच्या प्रशासनाने पोलिसांना कळविताच एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. दरम्यान, शाळेत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासल्यानंतर पोलिसांकडून हे फुटेज ताब्यात घेण्यात आले. 

चारही चोरटे 20 ते 30 वयोगटातील 
शाळेत चोरी करणारे चारही चोरटे हे 20 ते 30 वयोगटातील असून, ते सडपातळ होते. यातील एका चोरट्याने हाफ पॅन्ट परिधान केली होती. तसेच या चारही चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने त्यांचे चेहरे अस्पष्ट होते. 

देवकर महाविद्यालयात चोरीचा प्रयत्न 
शिरसोली रस्त्यावरील एल. एच. पाटील इंग्लिश स्कूलमध्ये चोरी केल्यानंतर त्याच चोरट्यांनी त्याठिकाणाहून काही अंतरावरच असलेल्या गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश केला. 
परंतु महाविद्यालयात त्यांना काहीच मिळून न आल्याने चोरट्यांनी त्याठिकाणी असलेल्या सामान व कपाटातील काही महत्त्वाची कागदपत्रे व सामान अस्ताव्यस्त फेकला. तसेच याठिकाणावरील कपाटांच्या काचा फोडीत नुकसान केले. परंतु या घटनेबाबत पोलिसात अद्यापपर्यंत कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgon news school chori news