"सोशल मीडिया' ज्ञानाचे माध्यम नाही 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

"सोशल मीडिया' ज्ञानाचे माध्यम नाही 
जळगाव : आजची युवा पिढी आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईल आणि टीव्ही पाहण्यात घालवते. त्यामुळे युवा पिढी आपल्या लक्ष्यापासून दूर जात असून, युवकांचा सर्वांत मोठे शत्रू मोबाईल व टीव्ही झाले आहेत. "टीव्ही' व "सोशल मीडिया' ज्ञानाचे माध्यम नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले. 

"सोशल मीडिया' ज्ञानाचे माध्यम नाही 
जळगाव : आजची युवा पिढी आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईल आणि टीव्ही पाहण्यात घालवते. त्यामुळे युवा पिढी आपल्या लक्ष्यापासून दूर जात असून, युवकांचा सर्वांत मोठे शत्रू मोबाईल व टीव्ही झाले आहेत. "टीव्ही' व "सोशल मीडिया' ज्ञानाचे माध्यम नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले. 
रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये आयोजित यिन संवादावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक प्रीतम रायसोनी, प्राचार्या डॉ. प्रीती अग्रवाल, योगशिक्षिका अनिता पाटील होते. डॉ. ढाकणे म्हणाले, की क्‍लास रूममध्ये इन्स्टिट्यूट प्रशासनाने मोबाईलवर बॅन आणला, तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीत झपाट्याने वाढ होईल तसेच विद्यार्थ्यांनी वर्गातील अध्ययनाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ताण बऱ्यापैकी हलका होईल, हे निश्‍चित. युवकांनी आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिस्तीचे आचरण करावे, शिस्तीच्या विरोधात कधीही वागू नये तसेच जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन करण्याचा ध्यास अंगीकारावा. खानदेश यिन समन्वयक अंकुश सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. रफिक शेख व राज कांकरिया यांनी आभार मानले. 

 
योगातून आत्मविश्‍वास वाढीस 
योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. योगाचे महत्त्व लक्षात घेऊनच 21 जून हा सर्वांत मोठा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. निर्जीव वस्तूंची जेवढी काळजी घेतली जाते तेवढीच सजीव शरीराची खरोखरच आपण घेतो का? नाही. म्हणूनच अचानक मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. योग आणि आपण याचा काहीतरी संबंध आहे, हे सर्वप्रथम सर्वांनी जाणून घ्यावे. पृथ्वीतलावर जन्म घेतल्यापासून मरेपर्यंत मानवाचा शरीर अन्‌ आरोग्याशी संबंध येतो. शरीर सुदृढ असेल, तर त्याचे आरोग्यही निरोगी असते. आरोग्य निरोगी असेल तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप सोईस्करपणे पार पडतात. त्यामुळे योगा हा एकच मार्ग प्रत्येकाला निरोगी आयुष्य ठामपणे देऊ शकतो, असा विश्‍वास आंतरराष्ट्रीय योगशिक्षिका अनिता पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केला. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgon news soshal midiya