"जळगाव क्रिकेट लीग' ठरणार पायोनिअर! 

"जळगाव क्रिकेट लीग' ठरणार पायोनिअर! 

"जळगाव क्रिकेट लीग' ठरणार पायोनिअर! 
जळगाव : जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे यंदा प्रथमच "आयसीसी'चे नियम लागू असलेली व "आयपीएल'च्या धर्तीवर आयोजित "जळगाव क्रिकेट लीग' स्पर्धा होत असून, ही स्पर्धा क्रिकेट आणि एकूणच क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी "पायोनिअर' ठरणार असल्याचे मानले जात आहे. रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सने पुरस्कृत केलेल्या या क्रिकेट स्पर्धेसाठी असोसिएशनतर्फे जय्यत तयारी सुरू असून, जळगावकर क्रिकेटप्रेमी सज्ज झाले आहेत. 

जळगावसारख्या ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लहान महानगरात खरेतर क्रीडाविश्‍व म्हणावे तसे विकसित झाले नाही. जळगावातील काही हौशी क्रीडा संस्था त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यात जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. या असोसिएशनच्या माध्यमातून, विशेषत: अध्यक्ष अतुल जैन यांच्या पुढाकाराने यंदा प्रथमच "जळगाव क्रिकेट लीग' ही टी-20 क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत 12 ते 17 मार्चदरम्यान दररोज तीन सामने होतील. दोन उपांत्य व शेवटी अंतिम सामना होईल. 

"आयसीसी', "आयपीएल'चा दर्जा 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे परिषदेचे (आयसीसी) नियम आणि "आयपीएल'च्या धर्तीवरील ही स्पर्धा जळगावातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठीचे पंच असतील. मैदानावरील दोन पंच, तिसरे पंच व सामनाधिकारी (मॅच रेफरी) अशी रचना असेल आणि "आयसीसी'प्रमाणेच या पंच, अधिकाऱ्यांना सामन्यांबाबतचे सर्व अधिकार प्रदान केलेले असतील. 

"टर्फ विकेट' करणार तयार 
क्रिकेट सामन्यांसाठीचे मैदान जळगावात उपलब्ध नाही. तशी खेळपट्टीही नाही. तरीही छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात मॅटिंग करून "टर्फ विकेट' तयार केली जाणार आहे. या विकेटमुळे सामने चुरशीचे व धमाकेदार ठरतील, असा विश्‍वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. स्वत: असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अविनाश लाठी, अरविंद देशपांडे यांच्याकडे स्पर्धेचे संपूर्ण व्यवस्थापन असून, स्पर्धा यशस्वितेसाठी असंख्य हात कार्यरत आहेत. 

या संघांचा सहभाग 
स्पर्धेसाठी दोन गट निश्‍चित करण्यात आले असून, "ए' गटात एम. के. वॉरियर्स, के. के. कॅन्स थंडर्स, रायसोनी अचिव्हर्स आणि वनिरा इगल्स; तर "बी' गटात स्पेक्‍ट्रम चॅलेंजर्स, एस. के. हेल्थी मास्टर्स, खानदेश ब्लास्टर्स व कोझी कॉटेज स्ट्रायकर्स या संघांचा समावेश आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com