जारगाव येथे जवानाची गळफास घेऊन आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी खिडकीतून डोकावून बघितले असता त्यांनी गळफास घेतल्याचे लक्षात आले. त्यानंतर दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढण्यात आले व ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

पाचोरा : जारगाव ता. पाचोरा येथील रहिवासी व सध्या औरंगाबाद येथील इंडियन आर्मी पथकात नियुक्तीस असलेल्या 40 वर्षीय जवानाने आज सकाळी जारगाव येथे आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरले असून या जवानाच्या आत्महत्येमागील नेमके कारण मात्र कळू शकले नाही.

नितीन पाटील असे या जवानाचे नाव असून, ते 2004 मध्ये इंडियन आर्मीत भरती झाले होते. अनेक ठिकाणी सेवा बजावल्यानंतर सध्या त्यांची नियुक्ती औरंगाबाद येथे होती. गेल्या चार महिन्यांपूर्वी ते सुटीवर घरी आले होते. परंतु आपल्या मुख्यालयातून अनेकदा बोलावणे होऊनदेखील ते आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी जात नव्हते. आज सकाळी नऊच्या सुमारास नितीन पाटील यांनी आपल्या खोलीचा दरवाजा आतून बंद करून छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी खिडकीतून डोकावून बघितले असता त्यांनी गळफास घेतल्याचे लक्षात आले. त्यानंतर दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढण्यात आले व ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

या जवानाच्या आत्महत्येमागील नेमके कारण गुलदस्त्यात असून, सेवानिवृत्तीला फक्त पाच महिने शिल्लक असताना आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी न जाण्या मागचे कारण काय ? आपली जीवन यात्रा संपवण्यामागचे कारण काय ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मयत जवान नितीन पाटील यांच्या पश्चात वृद्ध पिता-पत्नी दोन मुले भाऊ असा परिवार असून, नितीन पाटील हे घरात एकटेच कमावणारे होते. त्यांनीच आत्महत्या केल्याने पाटील परिवार कमालीचा खालावला आहे. त्यांच्यावर सायंकाळी उशीरा पाचोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Jawan done Suicide by Hanging Himself at Jargon