हृदय वगळता ठप्प झालेल्या शरीराला  डॉक्‍टरांच्या अथक प्रयत्नांनी संजीवनी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

जन्माला आले की मरण अटळ आहे पण कधी कधी मरणावरही विजय मिळविता येऊ शकतो, असे सांगितले तर विश्‍वास बसणार नाही पण नियतीच्या मनात असेल तर असेही काही होऊ शकते. त्यासाठी नशीब बलवत्तर आणि प्रयत्नांची साथ असावी लागते हे साबरवाडी येथील जयश्रीच्या (वय 14) बाबतीत झाले.

येवला - जन्माला आले की मरण अटळ आहे पण कधी कधी मरणावरही विजय मिळविता येऊ शकतो, असे सांगितले तर विश्‍वास बसणार नाही पण नियतीच्या मनात असेल तर असेही काही होऊ शकते. त्यासाठी नशीब बलवत्तर आणि प्रयत्नांची साथ असावी लागते हे साबरवाडी येथील जयश्रीच्या (वय 14) बाबतीत झाले. हृदय वगळता संपूर्ण शरीरच मरणाच्या दारात गेलेले असताना येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत काकड यांनी शर्थीचे प्रयत्न करून या मुलीला नवा जन्म दिला आहे. 

साबरवाडी येथील जयश्रीला अतिविषारी कोब्रा जातीच्या सर्पाने दंश केला होता. आई-वडिलांनी तिला तातडीने येवल्यात उपचारासाठी आणले; परंतु तिची कोमात गेल्याची अवस्था बघून सर्वच डॉक्‍टरांनी नाशिक किंवा शिर्डी येथे रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. अखेर रात्री दहाच्या सुमारास तिचे नातेवाईक डॉ. श्रीकांत काकड यांच्या साई सिद्धी हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. मुळात श्‍वास पूर्णपणे थांबून जयश्री अक्षरशः कोमात गेली होती. हृदय वगळता श्‍वास पूर्णपणे थांबला होता. अशा स्थितीत तिला बाहेर उपचारासाठी पाठविले तर रस्त्यात धोका होता. डॉ. काकड यांनी धोका पत्कारून उपचारासाठी दाखल करून घेतले. छोटे बंधू डॉ. राहुल काकड यांच्या मदतीने उपचार सुरू केले अन्‌ अखेर डॉक्‍टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश आले ते तिसऱ्या दिवशी. जयश्रीने डोळे उघडले आणि सर्वांच्या जिवात जीव आला. पाचव्या दिवशी तिला व्हेंटिलेटरवरून बाहेर काढले. सातव्या दिवशी जयश्री 30 पायऱ्या उतरून या दोन डॉक्‍टर भावांचे धन्यवाद देण्यासाठी खालच्या मजल्यावर आली. या वेळी डॉ. काकड यांच्या डोळ्यांत पाणी तरळले. शिवसेनेचे नेते संभाजी पवार, बापू गायकवाड आदींनी प्रतिबंधक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी केलेले मोलाचे सहकार्य व सर्पमित्र निखिल पाटील, गोविंद शिंदे यांचे या उपचारादरम्यान डॉक्‍टरांना सहकार्य लाभले. 

मरणासन्न अवस्थेतून एका रुग्णाला आपण उपचारातून नवा जन्म देऊ शकलो या आनंदात मंगळवारी (ता. 18) डॉ. काकड यांनी स्वतःचा वाढदिवस जयश्रीच्या हस्ते केक कापून साजरा केला. माजी आमदार मारोतराव पवार, अरुण काळे, प्रवीण गायकवाड आदींनीदेखील डॉक्‍टरांचा सत्कार करत जयश्रीच्या यशस्वी उपचाराबद्दल कौतुक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jayshree operation successful after doctors efforts