गणित, भौतिकच्या काठिण्य पातळीने कस 

गणित, भौतिकच्या काठिण्य पातळीने कस 

नाशिक - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या (आयआयटी) प्रवेशासाठी अंतिम टप्पा असलेली जॉइंट एंट्रन्स एक्‍झाम (जेईई) ऍडव्हान्स्ड परीक्षा आज शहरात तीन केंद्रांवर झाली. उत्तर महाराष्ट्रातील तेराशे विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. दोन सत्रांमध्ये झालेल्या या परीक्षेत गणित व भौतिकशास्त्राच्या प्रश्‍नांनी विद्यार्थ्यांची चांगलीच कसोटी पाहिली. सायंकाळी पेपर संपेपर्यंत पालक परीक्षा केंद्राबाहेर ठाण मांडून होते. 

जेईई मेन्स परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेचा अर्ज भरला होता. नियोजित वेळापत्रकानुसार आज परीक्षा झाली. प्रथमच नाशिकमध्ये झालेल्या या परीक्षेसाठी नाशिकमधील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या ऍड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय व क. का. वाघ संस्थेचे महाविद्यालय असे तीन केंद्र आजच्या परीक्षेसाठी निश्‍चित करण्यात आले होते. 

परीक्षा केंद्रापासून पालकांना ठराविक अंतरावरच थांबण्यास सांगण्यात आले. ओळखपत्र पाहून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सोडण्यात येत होते. पहिल्या सत्रातील पेपर दुपारी बाराला सुटल्यानंतर विद्यार्थी केंद्राबाहेर पडले. बहुतांश पालकांनी पाल्यासाठी घरूनच डबा आणला होता. सावलीचा शोध घेत विद्यार्थ्यांनी जेवण करत लगेचच दुसऱ्या पेपरसाठी साडेबारापासून लगबग सुरू केली. पेपर  दोन दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत झाला. 

हाफ टी-शर्ट अन्‌ चप्पलवर हजर झाले विद्यार्थी 
जेईई मेन्स परीक्षेत पोशाखाच्या समस्येने अनेक विद्यार्थ्यांना हैराण करून सोडले होते. त्यामुळे आजच्या परीक्षेसाठी सर्वच मुले-मुली टी-शर्ट किंवा शर्टमध्ये व पायात चप्पल घातलेले आढळले. काहींनी तर प्रवेशपत्राची अतिरिक्‍त प्रत स्वत:जवळ बाळगली होती. 

आयआयटीयन्स पेसतर्फे व्हॅनीटी व्हॅनची सुविधा 
एरवी अभिनेत्यांच्या सुविधेसाठी व्हॅनीटी व्हॅनचा वापर होत असतो. परंतु विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी आयआयटीयन्स पेस नाशिक शाखेतर्फे व्हॅनीटी व्हॅन उपलब्ध करून दिली होती. उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासह विद्यार्थ्यांना तणावमुक्‍त वातावरणात अभ्यास, सराव, विश्रांती करण्यासह प्रसाधनगृहाची सुविधा या वाहनात उपलब्ध होती. या वाहनामुळे विद्यार्थ्यांची सुविधा झाली. 

"पार्शियल मार्किंग स्कीम'चा विद्यार्थ्यांना फायदा शक्‍य 
ऍडव्हान्स्ड परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपातील प्रश्‍न विचारण्यात आले. यात विद्यार्थ्यांना उत्तराचे पर्याय निवडण्यासाठी पार्शियल मार्किंग स्कीम उपलब्ध करून दिली होती. या पद्धतीमुळे चुकीच्या उत्तरामुळे निगेटिव्ह मार्किंगमुळे गुणांमध्ये होणारी कपात काहीअंशी कमी होऊ शकेल. या पद्धतीचा विद्यार्थ्यांना फायदा होईल, असा विश्‍वास शिक्षक, पालकांनी व्यक्‍त केला. 

विद्यार्थी म्हणाले.. 
आजची परीक्षा सोपी गेली. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यामुळे चांगले गुण मिळण्याची शक्‍यता आहे. दुसऱ्या सत्रातील पेपरची काठिण्य पातळी जास्त जाणवली. 
- वृंदा राठी 

पहिला पेपर सोपा वाटला; पण पेपर दोन थोडा कठीण होता. एकूणच चांगले गुण मिळतील, अशी अपेक्षा आहे. सचोटीने पेपर सोडविण्याचा प्रयत्न केला. 
- अनुपकुमार सोनार 

रसायनशास्त्र विषयाचे प्रश्‍न सोपे वाटले, तर गणिताचे प्रश्‍न थोडेसे कठीण होते. आता परीक्षेच्या निकालाकडे लक्ष असणार आहे. 
- श्रुतिका मोरे

पेपर चांगला होता; पण गणित व भौतिकशास्त्र विषयाचे प्रश्‍न कठीण वाटले. सर्व प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य दिले असून, चांगले गुण मिळतील, असा विश्‍वास आहे. 
- धनश्री बोडके 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com