मौजमजेसाठी चोरले आईचे दागिने

Theft
Theft

नाशिक - मौजमजा करण्याचे खूळ बारावीत शिकणाऱ्या मुलाच्या डोक्‍यात शिरले अन्‌ घरातील ३४ तोळे सोन्यावर त्याने हात मारला. गुन्हा दाखल झाल्यानंतर साऱ्या शक्‍यता तपासून पाहिल्या; परंतु हाती काहीही लागेना. आई अन्‌ मुलाची कसून चौकशी केली तरीही मागमूस लागेना. अखेर पोलिसांनी मुलावर सतत पाळत ठेवली असता, त्याची मौजमजा पाहून त्यांना धक्काच बसला अन्‌ एकेक करत साखळ्या जुळल्या अन्‌ गुन्हा उलगडला.

त्र्यंबक रोडवरील सोसायटीमध्ये एक महिला अन्‌ त्यांचा बारावीत शिक्षण घेणारा अल्पवयीन मुलगा राहतो. ऑगस्ट महिन्यात महिलेने ३४ तोळे सोने घरातील कपाटात ठेवले होते. त्यानंतर २ नोव्हेंबरला त्यांनी दिवाळीनिमित्ताने सोने काढण्यासाठी कपाट उघडले तर सारे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. संशय कोणावर घेणार, असा प्रश्‍न उभा राहिला. त्यांनी सरकारवाडा पोलिसांत धाव घेतली. गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी त्यांच्या नेहमीच्या तपासाप्रमाणे शोध सुरू केला. परंतु त्यांच्या हाती काहीही लागत नव्हते. तीन महिन्यांच्या काळात त्यांच्याकडे कोणी राहावयासही पाहुणे मंडळी आली नव्हती. साऱ्या शक्‍यताची पडताळणी करून झाली. अखेर त्यांनी दोघा मायलेकांवरच लक्ष केंद्रित केले. महिलेचीही कसून चौकशी केली. मुलाकडेही चौकशी केली. मात्र, तोही कबूल झाला नाही. 
अखेर पोलिसांनी दोघांवर पाळत ठेवली. त्यात त्यांना मुलाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्याच्या मागावरच काही पोलिस सतत राहिले. ज्या मित्रांसमवेत तो सतत राहत होता त्यांना ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता, त्यांच्यासह तो मौजमजा करीत असल्याचे समोर आले.

महागडे कपडे, चैनीच्या वस्तू खरेदी करीत होता. एवढेच नव्हे, तर एक कारही त्याने खरेदी केली होती. पोलिसांनी महिलेच्या मुलास चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतरही तो गुन्ह्याची कबुली देत नसल्याचे पाहून पोलिसांनी सारंच त्याच्यासमोर मांडल्यावर त्याने कबुली दिली. त्यानेच ३४ तोळे सोने चोरले होते. त्यातील १२ तोळे सोने त्याने अनेक सराफी पेढ्यांवर विकले. ते विकत घेताना त्याने चक्क आई अत्यंत आजारी असल्याने तिच्या उपचारासाठीच सोने विकावे लागत असल्याचे सांगितले. त्यासाठी त्याच्या मित्रांनीही त्याला मदत केली. गुन्ह्याचा उलगडा झाल्यानंतर त्या महिलेसही आश्‍चर्याचा धक्काच बसला. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेत बालनिरीक्षण गृहात दाखल केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com