दागिने, पैसे असलेली पर्स रिक्षाचालकाकडून परत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

जुने नाशिक - रिक्षामध्ये विसरलेली पर्स प्रामाणिक रिक्षाचालकाने महिलेच्या कुटुंबीयाना परत केली. त्यामुळे भद्रकाली पोलिसांनी त्याचे कौतुक केले. 

जुने नाशिक - रिक्षामध्ये विसरलेली पर्स प्रामाणिक रिक्षाचालकाने महिलेच्या कुटुंबीयाना परत केली. त्यामुळे भद्रकाली पोलिसांनी त्याचे कौतुक केले. 

मुंबई नाका परिसरातील कमोदनगर येथून भोसले कुटुंबीय पवननगरला जाण्यासाठी इर्शाद अली सय्यद (रा. नानावली, जुने नाशिक) यांच्या (एमएच 15 एफयू 1153) या रिक्षात बसले. आशा भोसले यांनी रिक्षाच्या सीटमागे पर्स ठेवली. भोसले कुटुंबीयांना त्याने पवननगरला सोडले. तीन मोबाईल, दागिने तसेच रोख रक्कम असलेली पर्स मात्र त्या रिक्षातच विसरल्या. शनिवारी (ता. 4) दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला. एक तासानंतर पर्स रिक्षात विसरल्याचे भोसले कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांनी अंबड पोलिस ठाणे गाठत पोलिसांना माहिती दिली. तोपर्यंत रिक्षाचालक तेथून निघून प्रथम द्वारका, त्यानंतर पिंपळगाव येथे प्रवासी सोडण्यासाठी गेला. पाणी पिण्यासाठी इर्शाद काही वेळ थांबला असता रिक्षात मोबाईल वाजण्याचा आवाज झाला. त्याने रिक्षात शोध घेतला असता सीटमागे पर्स आढळली. त्याने पर्समधून मोबाईल काढत संवाद साधला. भोसले कुटुंबीयांना पर्स सुखरूप असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने पोलिस कर्मचारी हसन पठाण यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी रिक्षाचालकासह कौतिक भोसले यांना दुपारी साडेचारच्या सुमारास भद्रकाली पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. पोलिस ठाण्यात नोंद करून घेत भोसले कुटुंबीयांना त्यांची पर्स परत केली. भोसले कुटुंबीयांनी त्याचे आभार मानले. 

Web Title: Jewelry, money back from the autorickshaw driver