नोकरीअभावी जुळेनात भावी शिक्षकांचे विवाह

विजय पगारे
बुधवार, 17 एप्रिल 2019

गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षकभरतीस टाळाटाळ केली जात आहे. सर्व सोपस्कर पार पाडूनही ऐन तोंडाजवळ आलेला घास या-ना-त्या प्रकारे हिरावला जातो. दिवसेंदिवस वय वाढत चालले आहे. नोकरीवालाच मुलगा पाहिजे, अशा अटीमुळे भविष्यात काय होईल याचीच आता भीती वाटू लागली आहे. 
- चेतन निकम, बीएड पदवीधारक, पारनेर निताणे, जि. नाशिक

इगतपुरी - राज्य सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकभरती प्रक्रिया थांबविलेली असल्यामुळे सेट, नेट, पीएचडी, बीएड, डीएड यांसारख्या पदव्या प्राप्त करूनदेखील नोकरी मिळेनाशी झाली आहे. मिळाली तरी ती तात्पुरत्या स्वरूपात मिळत असून, त्या ठिकाणीदेखील भावी शिक्षकांना नाइलाजाने मिळेल ते काम अतिशय तुटपुंज्या पगारावर करावे लागते.

शिक्षणासाठी आयुष्यातील वीस-पंचवीस वर्षे खर्च करून देखील शिक्षकभरती प्रक्रियाबंदीमुळे नोकरी मिळण्याची शक्‍यता कमी असल्याने राज्यातील कायमस्वरूपी नोकरीच्या शोधात असणाऱ्या अनेक भावी शिक्षकांच्या मानसिक ताणतणावात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांना भविष्याची चिंता सतावत आहे. 

अनेक कुटुंबांतील आर्थिकदृष्ट्या गरीब मुले-मुली कर्ज काढून आपले शिक्षण पूर्ण करीत आहेत. पण शिक्षण पूर्ण होऊनदेखील कित्येक वर्षे त्यांना कायमस्वरूपी नोकरीच मिळत नसल्यामुळे शिक्षणासाठी काढलेल्या कर्जाचे व्याजही इच्छा असताना ते भरू शकत नाहीत. 

त्यामुळे अनेक उच्चशिक्षित भावी शिक्षक शाळा, महाविद्यालयांत काही तास नोकरी करून बाकीच्या वेळेत हॉटेल चालविणे, चहाची टपरी टाकणे, गॅरेज टाकणे, कंपनीत पार्टटाइम काम करणे, पेट्रोलपंपावर काम करणे, एखादे छोटेसे दुकान टाकणे अथवा खासगी क्‍लास घेणे, अशा पद्धतीने जोडव्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करताना अनेक ठिकाणी दिसून येते.

कायमस्वरूपी नोकरीची शाश्‍वती नसल्यामुळे अशा मुलांचे विवाह होण्यात अनेक अडथळे येत आहेत. पालकांच्या चिंतेतदेखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक भावी शिक्षकांचे विवाहाचे वयही उलटून गेले आहे.

Web Title: Job Teacher Marriage