Vidhan Sabha 2019 : कदमांच्या वीस वर्षांच्या सत्तेला घरातूनच आव्हान

माणिक देसाई
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा तालुका म्हणून निफाडकडे बघितले जाते. या तालुक्‍याच्या राजकारणात काँग्रेस पक्षाला आव्हान देत शिवसेनेचा झंझावात निर्माण करणाऱ्या ओझर येथील कदम घराण्याने (स्व.) आमदार रावसाहेब कदम, माजी आमदार माईसाहेब कदम, विद्यमान आमदार अनिल कदम असे तीन आमदार दिले आहेत.

जिल्ह्यातील सहकार शिक्षण, राजकारण यावर कायमच निफाड तालुका आणि तेथील मोगल, बोरस्ते, पवार, वाघ यांच्याबरोबरच कदम घराण्यांची छाप राहिली आहे. जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा तालुका म्हणून निफाडकडे बघितले जाते. या तालुक्‍याच्या राजकारणात काँग्रेस पक्षाला आव्हान देत शिवसेनेचा झंझावात निर्माण करणाऱ्या ओझर येथील कदम घराण्याने (स्व.) आमदार रावसाहेब कदम, माजी आमदार माईसाहेब कदम, विद्यमान आमदार अनिल कदम असे तीन आमदार दिले आहेत. तालुक्‍याच्या राजकारणात तब्बल वीस वर्षांहून अधिक काळ आपल्या कारकीर्दीचा ठसा उमटविला आहे. मात्र यावेळी याला घरातूनच अर्थात यतीन कदम यांचे आव्हान असणार आहे.

देशभरात एचएएलमुळे ओझर मिग हे गाव प्रख्यात आहे. तालुक्‍यातील मोठे गाव जे तालुक्‍याच्या राजकारणाचा बाज ठरवते त्या गावाच्या सत्ताकारणाची सूत्रे नेहमीच कदम घराण्याकडे राहिल्याने तालुक्‍याच्या सत्ता पटलावर कदम कुटुंबाने मजबूत पकड निर्माण केली आहे. निफाड विधानसभा मतदारसंघ म्हटला, की एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला (स्व.) माजी आमदार मालोजीकाका मोगल यांनी मतदारसंघावर मजबूत पकड मिळवत तीन वेळा आमदारकी भूषवत तालुक्‍याच्या सर्वच संस्था काँग्रेस झालेल्या असताना काकांचे सहकारी असलेल्या (स्व.) आमदार रावसाहेब कदम यांनी प्रथम अपक्ष विमान निशानीवर तालुक्‍यात झंझावात निर्माण केला. त्यानंतर शिवसेनेचा भगवा हाती घेत १९९५ मध्ये जिल्ह्यातील सर्व केंद्रस्थाने एकवटलेल्या काँग्रेसच्या मालोजीराव मोगल यांना मात देऊन पहिल्यांदाच या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला. निफाडचे काँग्रेसचे तटबंदीचे बुरूज ढासळले ते पुन्हा उजरूच शकले नाहीत. (स्व.) रावसाहेब कदमांच्या अपघाती निधनानंतर १९९७ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत रावसाहेब कदम यांच्या पत्नी मंदाकिनी कदम यांच्यावर तालुक्‍याच्या जनतेने विश्‍वास दाखवत निवडून दिले. निफाडची पाहिली महिला आमदार म्हणून शिवसेनेने मान मिळविला. त्यानंतर १९९९ मध्येही मंदाकिनी कदम विजयी झाल्या. २००४ मध्ये मात्र दिलीप बनकर यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी करून शिवसेनेचा हा विजयरथ रोखला. 

२००९ मध्ये शिवसेनेच्या अनिल कदम यांनी राष्ट्रवादीचे दिलीप बनकर यांना पराभूत करत पुन्हा तालुका भगव्या झेंड्याखाली आणला. एकंदर पाहता १९९५ ते २०१४ या काळात २००४ चा बनकरांचा विजय वगळता सत्तेची सूत्रे ही कदम कुटुंबाकडेच राहिली आहेत. राजकारणातल्या अस्रांचा प्रभावीपणे वापर करण्याचे कसब अवगत असलेल्या आमदार कदम यांना रोखण्यासाठी त्यांचे विरोधक एकवटतात. मात्र त्यांच्या संघटनकौशल्य, मतदारसंघातील कामे आणि तालुक्‍याच्या प्रश्‍नासह मराठा आरक्षणाबाबत मांडलेली भूमिका, तरुणात असलेली क्रेझ या जोरावर ते हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. तसेच यंदा लाल दिवा मिळेल, असा विश्‍वास निफाडकरांत असल्याने त्यांचे हौसले बुलंद झाले आहेत.

कदमांमधील सत्तासंघर्षाचा पुढील अंक
लोकसभा निवडणुकीत भाजप- सेना युतीची तार जुळली आणि डॉ. भारती पवार यांच्या विजयाने आमदार कदमांची पकड मजबूत झाली आहे. दुसरीकडे रावसाहेबांचे पुत्र यतीन कदम यांनी राजकारणात उडी घेतली. २००९ मध्ये मनसेची उमेदवारी करून ताकद अजमावली. त्यावेळी त्यानंतरच्या काळात तरुणांचे जाळे निर्माण करत विकास अघाडीच्या माध्यमातून ओझर गट आणि गणात आपली ताकद उभी केली आहे. शिवसेनेपुढे आव्हान निर्माण केले आहे. यंदाच्या निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर करत प्रचारात उडी घेतली असून, मिळाली तर पक्षाची अन्यथा सवतासुभा, असा पवित्रा घेत गावसभांना प्रारंभ केला आहे. दरम्यान, ओझर गाव आणि तेथील असलेली मतदारसंख्या तालुक्‍याच्या राजकारणात निर्णायक ठरली असून, याच जोरावर ओझर ग्रामपालिका, निफाड सहकारी साखर कारखाना, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सोसायट्या, विविध संस्था यावर कदम कुटुंबांचा अथवा कार्यकर्त्यांचा रुतुबा राहिल्याने निफाडसह जिल्ह्यातील राजकारणात कदम घराण्याने आपले वर्चस्व सिद्ध केले, हे मात्र निश्‍चित. निफाडच्या राजकारणावर कदमांचे कदम अधिक भक्कम होत असताना विद्यमान आमदार अनिल कदमांना आपले सख्खे चुलत भाऊ यतीन कदम आव्हान उभे करू पाहात आहेत. त्यामुळे निफाडच्या राजकारणावर एकसंध पकड ठेवलेल्या कदमांमधील सत्तासंघर्षाचा पुढील अंक निफाडच्या विधानसभेच्या रणांगणात होऊ घातल्याचे सद्यःस्थितीत दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kadam family hold in Niphad assembly seat