खानदेशात भाजप अडचणीत 

खानदेशात भाजप अडचणीत 

खानदेशात भाजप अडचणीत 


जळगावः यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जळगाव आणि नंदुरबार मतदारसंघात भाजपचे टेंशन वाढविणाऱ्या घडामोडी या दोन दिवसांत झाल्या आहेत. जळगाव मतदारसंघात विद्यमान खासदारांचा पत्ता कापून दिलेली भाजपची उमेदवारी आधीच डोकेदुखी ठरली असताना आता भाजपचे सहयोगी आमदार शिरीष चौधरी यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा केली आहे; तर नंदुरबारमध्ये भाजपतर्फे उमेदवार बदलाच्या हालचाली ऐनवेळी सुरू झाल्या आहेत. 

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच उमेदवारीची अनिश्‍चितता भाजपच्या गोटात होती. जळगावमधून विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांनी उमेदवारीचा प्रबळ दावा केला होता. त्यांनी दिल्ली दरबारी त्यासाठी वजनही वापरले होते. पण, पक्षांतर्गत सर्वेक्षण अहवालाचे कारण देवून त्यांच्याऐवजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे खासदार पाटलांनी बंडाचे निशाण फडकावण्याचा पवित्रा घेतला आहे. ते कमी की काय, म्हणून आज भाजपला मदत करणारे अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांनीही आज आपल्या उमेदवारीचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे टेंशन वाढले आहे. 
नंदुरबार मतदारसंघातही भाजपने विद्यमान युवा खासदार डॉ. हीना गावित यांनाच उमेदवारी दिली, तशी घोषणाही झाली. परंतु, त्यांचाही सर्वे रिपोर्ट विरोधात गेल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. प्राप्त माहितीनुसार डॉ. सुहास नटावदकर यांच्याशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून उमेदवारीसाठी चाचपणी झाल्याची माहिती मिळत आहे. असे झालेच, तर भाजपला नंदुबारमध्ये उमेदवार बदलाची नामुष्की पत्करावी लागणार आहे. शिवाय डॉ. विजयकुमार गावित भाजपच्या विरोधात काम करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या सर्व अडचणींवर तोडगा कसा काढावा असा प्रश्‍न भाजपसमोर उभा राहिला आहे. 

महाजन मुंबईला रवाना 
दोन दिवसांपासून घडणाऱ्या या घडामोडींमुळे भाजप नेत्यांनी उद्या मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या दोन्ही मतदारसंघांत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या बैठकीसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे रात्री तातडीने मुंबईला रवाना झाल्याची माहिती आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com