केदार पाटील आत्महत्याप्रकरणी संशयित न्यायालयीन कोठडीत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

जळगाव - हिरा-शिवा कॉलनीतील रहिवासी केदार सुभाष पाटील आत्महत्या प्रकरणातील संशयित गजानन निकमला पोलिस कोठडी संपल्याने न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले. त्याचा साथीदार अद्याप फरारी असून, त्याचा शोध सुरू आहे. 

जळगाव - हिरा-शिवा कॉलनीतील रहिवासी केदार सुभाष पाटील आत्महत्या प्रकरणातील संशयित गजानन निकमला पोलिस कोठडी संपल्याने न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले. त्याचा साथीदार अद्याप फरारी असून, त्याचा शोध सुरू आहे. 

हिरा-शिवा कॉलनीतील रहिवासी केदार सुभाष पाटील (वय 26) याने 23 फेब्रुवारीला राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृत्यूनंतर त्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे, त्याला परिसरातीलच दोन तरुणांकडून मारहाण करीत मोबाईलवर "एमएमएस' तयार करून ब्लॅकमेलिंग करण्यात येत असल्याचे आढळले. केदारच्या पालकांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकेत असलेला संशयित गजानन निकमला पोलिस कोठडी संपल्याने न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्याचा साथीदार अद्याप फरारी आहे. 

शाहूनगर मार्केटमधील "पाटील इंजिनिअरिंग वर्क्‍स'मध्ये वडिलांसमवेत काम करणाऱ्या केदार पाटीलचे महिलेशी अनैतिक संबंध होते. तिला तू रोज मोटारसायकलीवरून दुकानावर सोडतो, असा आरोप करीत परिसरातीलच गजानन सुदाम निकम (वय 28, रा. हिरा-शिवा कॉलनी) व गौरव सोनवणे यांनी केदारला 22 फेब्रुवारीला रात्री नऊला निमखेडी शिवारातील शेतकी विद्यालयाजवळ नेत अंधारात बेदम मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेतला होता. सुभाष पाटील यांच्या तक्रारीवरून गजानन निकम आणि गौरव सोनवणे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. गजानन निकमला तालुका पोलिसांनी 26 फेब्रुवारीला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून, गुन्ह्यातील दुसरा संशयित तथा गजाननचा साथीदार गौरव अद्याप पोलिसांना सापडला नाही. त्याचा पोलिस शोध घेत आहेत. सरकारपक्षातर्फे न्यायालयात ऍड. निखिल कुळकर्णी यांनी कामकाज पाहिले. 

Web Title: kedar patil suicide case