जिल्हा रॉकेलमुक्त झाल्याचा दावा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

जळगाव - जिल्ह्यात रेशन दुकानावरील धान्यवाटपात आता मोठी सुधारणा झाली आहे. ‘सप्लाय चेंज मॅनेजमेंट सिस्टिम’च्या सुविधेमुळे शिधापत्रिकाधारकांना राज्यातून कोठूनही धान्य घेता येणार आहे. याची अंमलबजावणी डिसेंबरअखेरपासून होईल. तसेच जळगाव जिल्हा रॉकेलमुक्त झाला असून, राज्यातील ही पहिली घटना आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून राॅकेलची मागणी कमी करण्यावर भर देण्यात आला. तेव्हापासून ही मागणी कमी कमी होत गेली. जुलै महिन्यात जिल्ह्यासाठी ८ लाख ५० हजार लिटर रॉकेलची मागणी होती, ती नोव्हेंबर महिन्यात शून्यावर आली आहे. त्यामुळे राज्यातील एकमेव जळगाव जिल्हा पूर्णपणे केरोसिनमुक्त झाला आहे. पुणे व सोलापूर हे केवळ शहर रॉकेलमुक्त झाले आहेत. तेथील ग्रामीण भागात मात्र अद्यापही रॉकेलचा पुरवठा आहेच.

जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांवरून होणारे ८१ टक्के धान्य वितरण ई-पॉसद्वारे होऊ लागले असून, यातून धान्याचीही बचत होत आहे. ई-पॉसच्या अंमलबजावणीपूर्वी जिल्ह्यासाठी लागणाऱ्या तब्बल २१ हजार टन धान्याची वेळेत उचल होऊ शकत नव्हती. त्यामुळे ते रद्द झाले होते. मात्र ऑनलाइन प्रणालीमुळे वितरणात गती येऊन व मागणीबाबतही वेळेत कामे होऊ लागल्याने आवश्‍यक तेवढ्या धान्याची उचल होत असल्याचे सांगण्यात आले. मे महिन्यापासून आतापर्यंत ५० हजार ८०१  क्विंटल धान्याची बचत झाली आहे.

दृष्टिक्षेपात...
 रॉकेलमुक्तीमुळे अनुदानाच्या रकमेत चार कोटींची बचत.
 जिल्ह्यातील २०० स्वस्त धान्य दुकानांचा परवाना रद्द.
 स्वस्त धान्य दुकानातून मिळणार ५ किलोचे गॅस सिलिंडर.
 बी-बियाणे, मिनी बॅंक सेवा, ई-सेवा केंद्राची सुविधा.
 चुकीची नोंदी असलेल्या २३ हजार शिधापत्रिका दीड महिन्यात केल्या रद्द.

Web Title: Kerosene free district