खडसे-महाजनांतील मतभेद मिटविण्यास श्रेष्ठी सक्षम - चंद्रकांत पाटील

खडसे-महाजनांतील मतभेद मिटविण्यास श्रेष्ठी सक्षम - चंद्रकांत पाटील

जळगाव - मतभेद प्रत्येकाच्या घरात असतात, त्याप्रमाणेच भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथराव खडसे व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात वाद आहेत. त्यांच्यात मतभेद असले, तरी मनभेद मात्र नाहीत. त्यांच्यातील मतभेद मिटविता येतील, त्यासाठी पक्षश्रेष्ठीही सक्षम आहेत. कार्यकर्त्यांनी त्याची काळजी न करता जिल्हा परिषद व पदवीधर मतदारसंघात पक्षाला यश मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या बैठकीत बोलताना केले.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर श्री. पाटील प्रथमच जिल्ह्यात आले होते. नाशिक पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे त्यांनी सर्व शासकीय कार्यक्रम रद्द केले. मात्र पक्षाची बैठक बळिराम पेठेतील भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, महानगराध्यक्ष सुरेश भोळे, खासदार ए. टी. पाटील, रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, उन्मेष पाटील, स्मिता वाघ, संजय सावकारे, चंदू पटेल, जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे आदी उपस्थित होते. प्रारंभी पाटील यांचा सत्कार करण्यात  आला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केले.

देश बदलतोय, महाराष्ट्र घडतोय
श्री. पाटील म्हणाले, की देशात व राज्यात भाजपचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांत जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यांची केवळ ‘अटल पेन्शन’ ही एकमेव योजनाच जनतेच्या तीन पिढ्यांच्या हिताची आहे.
 

ती योजना जनतेला समजावून सांगितली, तरी देश बदलतोय हे लक्षात येईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही महाराष्ट्रात चांगल्या योजना लागू करून महाराष्ट्र घडवीत आहेत. त्यांनी मराठा, ओबीसी, आणि मुस्लीम समाजाच्या हितासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. मराठा समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर ‘सारथी’ही योजना लागू केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचविल्यास शासन आपल्यासाठी करीत असलेल्या कार्याची जनतेला माहिती मिळेल आणि त्यातूनच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत यश मिळेल.

जि. प.त ४० जागा जिंकू - महाजन
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, की जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आहे, ती कायम राखण्याचे आपल्यासमोर मोठे आव्हान आहे. शिवसेनेसोबत युती होवो किंवा न होवो, परंतु कमळाच्या चिन्हावर आपल्याला चाळीस जागा मिळवून बहुमत मिळवायचेच आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. नाशिक पदवीधर मतदारसंघही पुन्हा भाजपकडे आणण्यासाठी प्रयत्न करायचे असून, डॉ. प्रशांत पाटील यांना निवडून आणायचेच आहे.

सेनेला भुईसपाट करणार - वाघ
भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ म्हणाले, की जिल्हा परिषद, पंचायत समितीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने आमच्या सोबत सत्तेत लोणी चाटले. परंतु, आता ते आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत आहेत. यापुढे आम्ही ते सहन करणार नाहीत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळावरच सत्ता मिळविणार. मित्रपक्ष शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला भुईसपाट करणार. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 

खडसे महाराष्ट्राचे पालक
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाषणाच्या सुरवातीला खडसे यांचा उल्लेख महाराष्ट्राचे पालक असा केला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पुढे बोलताना पाटील म्हणाले, की मी टाळ्यांसाठी हे वाक्‍य बोललो नाही, तर मनापासून बोललो आहे. राज्यात भाजप वाढविण्यात ज्या काही चार-पाच लोकांचे योगदान आहे, त्यात खडसे यांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे ते आमच्यासाठी श्रद्धास्थान आहेत. याच अर्थाने ते भाजपत महाराष्ट्राचे पालक आहेत. त्यांच्या सध्याच्या स्थितीमुळे आम्हाला वेदना होत आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असा काळ येतो. खडसे हे हाडाचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे यातून निश्‍चित बाहेर पडतील.

प्रकल्पपूर्तीसाठी ‘ॲक्‍शन प्लॅन’
जळगाव : जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पांबाबत माहिती घेतली आहे. या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी प्राधान्यक्रम ठरवून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ‘ॲक्‍शन प्लॅन’ तयार करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच जळगावी आल्यानंतर दिवसभर त्यांनी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली. पक्षाची बैठक व एरंडोल नगराध्यक्षांच्या सत्कारानंतर सायंकाळी त्यांनी आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांच्या निवासस्थानी भोजन घेतले. पक्षातील अनेक जुने कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात सिंचनाचे मोठे प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडले आहेत, महामार्गाच्या चौपदरीकरणातही अडचणीत येत आहेत याबद्दल छेडले असता श्री. पाटील म्हणाले, की या सर्व प्रकल्पांच्या कामासाठी त्यांचा प्राधान्यक्रम ठरवला जाईल. महामार्ग चौपदरीकरणाचे काम मार्गी लागले आहे, निविदाही मंजूर आहे. हे काम लवकरच सुरू होऊन मुदतीत पूर्णही होईल. शेळगाव, पाडळसरे यासारखे सिंचनाचे प्रकल्प व अन्य योजनांच्या कामासाठी जिल्ह्यातील नेते, कार्यकर्त्यांशी बोलून ‘ॲक्‍शन प्लॅन’ तयार करून ही कामे पूर्ण केली जातील. 

दर आठवड्याला येणार
या ‘ॲक्‍शन प्लॅन’वर काम करण्यासाठी दर आठवड्याला जिल्ह्यात येण्याचे मी आधीच जाहीर केले आहे. प्रत्येक दौऱ्यात या कामांचा आढावा घेतला जाईल. जळगाव जिल्ह्याने भाजपला नेहमीच समर्थपणे साथ दिली आहे, त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी या चर्चेदरम्यान दिली. ते म्हणाले, की विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून काम केले त्यावेळी आमचे दहा-पंधरापेक्षा जास्त कार्यकर्ते नव्हते. आता जिल्ह्यात पक्षाची ताकद प्रचंड वाढली आहे. गेल्या पालिका निवडणुकीत आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीला साफ केले, आता जिल्हा परिषदेतही दोन्ही काँग्रेसचा सफाया करून दाखवू. यावेळी त्यांच्यासोबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार ए. टी. पाटील, आमदार उन्मेष पाटील, चंदू पटेल आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com