रनिंग... प्रत्येक क्रीडा प्रकाराचा "मातृखेळ' : "कॉम्ब्रेड' सतीश गुजरन 

satich gujran coffy with sakal
satich gujran coffy with sakal

जळगाव : धावणे आरोग्यदायीच आहे. यामधून आत्मविश्‍वास वाढत असतो. संपूर्ण दिवस "फ्रेश' राहतो. मुळात "रनिंग' करणे अगदी सोपे आणि सरळ आहे. कारण फुटबॉल, क्रिकेट असो की अन्य कोणता खेळ, हा सुरू करण्यापूर्वी "रनिंग' करावी लागत असते. यामुळे रनिंग म्हणजे प्रत्येक खेळासाठीची "आई'च म्हणजे मातृखेळ असल्याचे मत खानदेश रन मॅरेथॉनचे ब्रॅण्ड ऍम्बॅसिडर असलेले भारतातील एकमेव कॉम्ब्रेड सतीश गुजरन यांनी आज "सकाळ'शी संवाद साधताना मांडले. 
"जळगाव रनर ग्रुप'च्या माध्यमातून रविवारी (ता. 24) खानदेश रन मॅरेथॉन होत आहे. यंदाच्या सीझनमधील स्पर्धेसाठी ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील जागतिक मानांकित "कॉम्ब्रेड' मॅरेथॉन सलग दहा वेळा पूर्ण करणारे सतीश गुजरन यांनी आज (ता.22) "सकाळ'च्या औद्योगिक वसाहतीमधील कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या धावण्याचा सुरू झालेला प्रवास उलगडला. 

सिगारेट सोडण्यासाठी "रनिंग' 
आपण धावणार आणि कॉम्ब्रेड मॅरेथॉनपर्यंत पोहचणार, असा मनात कुठेही विचार नव्हता. पण सिगारेट पिण्याची लागलेली सवय सोडण्यासाठी धावण्यास सुरवात केली. त्यावेळी वयाची चाळिशी पूर्ण केल्याने एक किलोमीटर धावणे देखील अवघड जात होते. अगदी थांबून थांबून धावत होतो. पण हळूहळू सवय झाली. यातच 2004 मध्ये 21 कि.मी. मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला. परंतु, ही मॅरेथॉन "फिनिश' करू शकलो नाही. हाच माझ्यासाठी "टर्निंग पॉइंट' ठरल्याचे गुजरन यांनी सांगितले. पण ज्यासाठी रनिंग सुरू केली; ती सिगारेट 2009 पर्यंत सुरूच होती. मात्र, इशा फाउंडेशनच्या माध्यमातून योगा क्‍लास सुरू केला आणि सिगारेट सुटली. पण धावण्याची एक सवय स्वतःला लावून घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. 

आणखी 15 "कॉम्ब्रेड' धावायच्या 
जगातील सर्वांत कठीण मानली जाणारी 90 कि.मी.ची कॉम्ब्रेड मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करणे अवघड असते. या स्पर्धेत धावण्याची इच्छा असल्याने 2010 मध्ये नोंदणी करून तयारी सुरू केली. दक्षिण आफ्रिकेतील कॉम्ब्रेड मॅरेथॉन म्हणजे एक वर्ष डर्बन ते पिटरमन्‍रटबर्ग (अप) आणि दुसऱ्या वर्षी पिटरमरन्टबर्ग ते डर्बन (डाउन) अशी पूर्ण करावयाची असते. पहिल्या वर्षी सहभागी झाल्यानंतर 65 कि.मी. अंतर पूर्ण केल्यावर पायात दुखापत झाली होती. त्यावेळी हळूहळू अंतर पूर्ण करत गेलो. यामुळे आत्मविश्‍वास निर्माण झाला आणि तेव्हापासून सलग दहा वर्ष ही मॅरेथॉन धावून स्पर्धेसाठीचा (29,384) कायमस्वरूपी नंबर मिळाला. जो की भारतातून मिळविलेला एकमेव ठरलो आहे. परंतु आता या दहा मॅरेथॉन पूर्ण झाल्या असल्या तरी आणखी पंधरा कॉम्ब्रेड पूर्ण करण्याचा मानस गुजरन यांनी व्यक्‍त केला. 

"चॅरिटी'साठी मॅरेथॉनला धावूनच प्रवास 
गुजरन यांनी सिगारेट सोडण्यासाठी ईशा फाउंडेशनची मदत झाली. शिवाय, ईशा फाउंडेशनमार्फत चालविण्यात येणाऱ्या शाळेतील मुलांना मदत म्हणून गुजरन हे चॅरिटी जमा करत असतात. चॅरिटी जमा करण्यासाठीचे वैशिष्ट्‌य म्हणजे कोणत्याही मॅरेथॉनमध्ये ब्रॅंड ऍम्बॅसिडर किंवा सहभाग घ्यायचा असेल; तर त्या स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी बस, रेल्वेचा प्रवास न करता धावून पोहचत असतात. 2006 पासून याची सुरवात मुंबई- सुरत या रनसाठी केली आहे. याशिवाय वाशी- सातारा, नाशिक- शिर्डी, पुणे- औरंगाबाद, मुंबई- शिर्डी असा रनिंग प्रवास केला आहे. 
 
जळगावातूनही "कॉम्ब्रेड' 
जळगावातील धावण्याच्या "कल्चर'बद्दल बोलताना गुजरन म्हणाले, की जळगाव रनर्स ग्रुपची टिम चांगली आहे. त्यांनी धावण्याचे चांगले कल्चर निर्माण केले असून, हे वातावरण आणखी वाढणार आहे. जळगाव म्हणजे सर्वांत उच्च तापमान आणि सर्वांत कमी थंडी असलेले ठिकाण आहे. यामुळे येथील रनिंग करणारा व्यक्‍ती डर्बनच्या कॉम्ब्रेड मॅरेथॉनमध्ये जाऊन सहज धावू शकतो. शिवाय, जळगावातील रनिंग करणाऱ्यांमधून एक तरी "कॉम्ब्रेड' होणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. 

गुजरन यांच्याविषयी... 
- दहा वेळा कॉम्ब्रेड मॅरेथॉन पूर्ण करणारे पहिले भारतीय. 
- 25 अल्ट्रा मॅरेथॉन (42 कि.मी. पेक्षा अधिक अंतर) 
- 31 फूल मॅरेथॉन (42 कि.मी) 
- 29 हाफ मॅरेथॉन (21 कि.मी.) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com