अप्रमाणित खव्यावर दिवाळी कुणाची?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

जळगाव  - जिल्ह्यात गुजरातसह मध्य प्रदेशातून दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर खव्याची आवक झाली. अप्रमाणित आणि बनावट या संज्ञेत मोडणाऱ्या खव्यावर कारवाई करून ते नष्ट होणे अपेक्षित असताना फक्त कागदोपत्रीच खवा नष्ट झाल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे. उर्वरित मालावर अनेकांनी ‘ताव’ मारत लाखोंचा मलिदा लाटत जळगावकरांच्या पोटात अप्रमाणित खवा घातल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

जळगाव  - जिल्ह्यात गुजरातसह मध्य प्रदेशातून दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर खव्याची आवक झाली. अप्रमाणित आणि बनावट या संज्ञेत मोडणाऱ्या खव्यावर कारवाई करून ते नष्ट होणे अपेक्षित असताना फक्त कागदोपत्रीच खवा नष्ट झाल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे. उर्वरित मालावर अनेकांनी ‘ताव’ मारत लाखोंचा मलिदा लाटत जळगावकरांच्या पोटात अप्रमाणित खवा घातल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

दिवाळीच्या दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणावर खवा मागवला जातो, स्पेशल बर्फी, स्पेशल मावा या नावाने राज्य परिवहन विभागाच्या सरकारी बसवर कोडनेम टाकून तो बेवारस पद्धतीने आपल्या ठिकाणावर पोहोचतो. मुद्दाम मध्यरात्री पहाटेच्या गाड्यांनी माल पोहोचल्यावर ठराविक रिक्षा, मालवाहू वाहनाद्वारे चालक त्याला उचलतो आणि घेऊन पसार होतो. 

वास्तविक बनावट आणि शास्त्रीय भाषेत अप्रमाणित ठरणाऱ्या या खवारूपी विषावर कारवाईसाठी विशेष शासकीय यंत्रणा कार्यान्वित असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत कागदोपत्री कारवाई होते. नमुने (सॅम्पल) संकलित करून ते पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्याचा अहवाल मात्र महिने-सहा महिन्यांनी मिळत असल्याने मधल्या काळातच देवाण-घेवाणीचे व्यवहार उरकून घेत माल नष्ट केल्याचे पंचनामे तयार होतात.

ऑक्‍टोबरमधील कारवाई
दिवाळीसाठी २०१६ मध्ये ऑक्‍टोबरमध्ये धडाकेबाज कारवाई झाली, स्पेशल बर्फी, खोया, खवा या नावाने आलेल्या मालावर छापही पडली तो जप्तही करण्यात आला, मात्र नष्ट केला, की नाही याबद्दल शंका व्यक्त होत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या दप्तरी नोंद असलेल्या कारवाईच्या लेखा-जोखासह विशेष सूत्रांनी कळवलेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेल्या मालापैकी केवळ उस्मानाबाद येथील कन्साईनमेंट योग्यरीत्या नष्ट झाली आहे. उर्वरित मालावर कथित बोक्‍यांनी ताव मारला आहे.   

चाळीस टन खव्यासाठी छोटा हत्ती?
दिवाळीत ताब्यात घेतलेल्या खव्यावर, कोणी डल्ला मारला याचा बोभाटा होत असल्याची भनक अंतर्गत कार्यालयीन सूत्रांना लागल्याने जप्त खवा चक्क दोन छोटा हत्ती वाहनातून नेऊन तो रविवारनंतर (२९ जानेवारी) सोमवार-मंगळवारी नष्ट करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. चाळीस टन माल छोट्या हत्ती या पिकअप व्हॅनमध्ये घेऊन जाणे अशक्‍य असताना अन्न व औषध विभागाने ती शक्‍य करुन दाखवली आहे. इतर माल मात्र कागदोपत्री नष्ट दाखवून त्याची विल्हेवाट लावल्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे.

Web Title: khava issue in jalgav