‘खाविआ’-‘मनसे’चा शिवसेनेला पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

‘मनपा’ प्रभाग क्र. २४ ‘अ’ पोटनिवडणूक - भाजपतर्फे तिघांचे अर्ज
जळगाव - महापालिकेच्या प्रभाग क्र. २४ ‘अ’ मधील पोटनिवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी पाच उमेदवारांनी नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले. यात शिवसेनेच्या उमेदवारासाठी खानदेश विकास आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माघार घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा भाजप- शिवसेनेत लढत रंगण्याची चित्र दिसत आहे.

‘मनपा’ प्रभाग क्र. २४ ‘अ’ पोटनिवडणूक - भाजपतर्फे तिघांचे अर्ज
जळगाव - महापालिकेच्या प्रभाग क्र. २४ ‘अ’ मधील पोटनिवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी पाच उमेदवारांनी नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले. यात शिवसेनेच्या उमेदवारासाठी खानदेश विकास आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माघार घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा भाजप- शिवसेनेत लढत रंगण्याची चित्र दिसत आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील तीन महापालिका व काही महापालिकांमधील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम २२ मार्चला जाहीर केला. या कार्यक्रमानुसार जळगावातील प्रभाग क्र. २४ ‘अ’मध्ये पोटनिवडणूक होत असून ३ एप्रिलपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यानुसार आज शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या उमेदवार आशा दिलीप कोल्हे यांनी शिवसेनेकडून व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. तर अनिता शंकर चौधरी, अश्‍विनी चेतन चौधरी व सरला मच्छिंद्र चौधरी यांनी भाजप, अपक्ष असे प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले. अपक्ष म्हणून मनीषा शैलेंद्र ठाकूर यांनी एक अर्ज दाखल केला. अर्जांची छाननी बुधवारी (ता. ५) होणार असून ७ एप्रिलपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. तसेच ८ एप्रिलला चिन्हवाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 

शिवसेनेकडून आशा कोल्हेंचा अर्ज
शिवसेनेकडून आज आशा कोल्हे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, स्थायी समिती सभापती डॉ. वर्षा खडके, शिवसेनेचे गजानन मालपुरे, नितीन बरडे आदी खाविआ, शिवसेना व मनसेचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच भाजपकडून देखील अश्‍विनी चौधरी यांचा अर्ज दाखल करताना मनपातील गटनेते सुनील माळी, मिलिंद सपकाळे, किशोर बाविस्कर, प्रकाश बालाणी, जीवन अत्तरदे, संजय चौधरी, सुहास जोशी आदी पदाधिकारी होते. 

बिनविरोध करण्यासाठी खेळी
महापालिकेत नुकत्याच झालेल्या प्रभाग समिती सभापतींच्या निवडीत खानदेश विकास आघाडी, राष्ट्रवादी, मनसेने भाजपला दूर ठेवत निवड बिनविरोध केली होती. त्यामुळे ही निवडणूकदेखील शिवसेनेकडून खाविआ, मनसेला सोबत घेऊन बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, भाजप उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे भाजप-सेनेत लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. अर्थात, निवडणूक बिनविरोध होते की नाही, यासाठी अर्ज माघारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

Web Title: khavia-mns support to shivsena