पहिलीपाठोपाठ दुसरीसाठी 'खेळू, करू, शिकू' हा विषय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मे 2019

कवितांतून गणित
गणितातील संकल्पना सहज सुलभ होण्यासाठी कवितांचा वापर केला आहे. संख्यारेषा, संख्यामाळ, दशकपट्टी, दशकगठ्ठा यांसारख्या गणितीय संकल्पना खेळाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आल्या आहेत. कवितांतून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार शिकवला जाणार आहे.

नाशिक - पहिलीपाठोपाठ यंदा दुसरीसाठी पुनर्रचित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमामध्ये "खेळू, करू, शिकू' हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. या विषयाचे मूल्यमापन होणार नाही. तसेच मराठी, इंग्रजी आणि गणित हे तीन विषय शिकवताना वर्गात गुरुजनांनी कृती करून दाखवणे अपेक्षित आहे. अभ्यासक्रम आणि दैनंदिन जीवनाची सांगड घालण्याचा हा प्रयत्न असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

"खेळू, करू, शिकू' या विषयाच्या अध्यापनातून कृतीतून खेळ शिकवला जाईल. कारक कौशल्य विकसित करणे हा त्यामागील उद्देश असून, सुंदर हस्ताक्षर, स्नायूंची बळकटी अशा विविध विकासाच्या बाबी त्यात अभिप्रेत आहेत. धडे व कविता ज्ञानरचनावादावर आधारित आहेत.

गोष्टी रूपातील धड्यांमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना दिली जाणार आहे. चित्रांचा भरपूर वापर करण्यात आला आहे. परिचित वस्तू, झाडे, प्राणी, पक्षी याद्वारे अभ्यासाकडे कल वाढवायचा आहे. याखेरीज चित्रांच्या वापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता वाढवणे हे अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.

कवितांतून गणित
गणितातील संकल्पना सहज सुलभ होण्यासाठी कवितांचा वापर केला आहे. संख्यारेषा, संख्यामाळ, दशकपट्टी, दशकगठ्ठा यांसारख्या गणितीय संकल्पना खेळाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आल्या आहेत. कवितांतून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार शिकवला जाणार आहे.

विनोद अन्‌ चुटके
धड्याच्या शेवटी विनोद आणि चुटके देण्यात आले आहेत. आनंददायी अध्यापन पद्धतीचा अवलंब आणि त्याआधारे विद्यार्थ्यांना प्रमाण भाषेकडे नेणे सुलभ व्हावे असे त्यामागील कारण आहे. त्याचप्रमाणे शब्दकोडी, शब्दखेळांचा धड्यांच्या शेवटी समावेश करत विद्यार्थ्यांच्या शब्दसंपत्तीत वाढ करण्याचा प्रयत्न आहे. शब्द, वाक्‍य, परिच्छेद अशा पद्धतीने भाषा विकास केला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khelu Karu Shiku Subject for Second Class Education