कोई मुर्गा नही काटेगा एैसा मेरे बच्चे के साथ हुवा है!

Murder
Murder

जळगाव - टोणगाव (ता. भडगाव) येथील बेपत्ता बब्बू सय्यद यांचा मुलगा इसम (वय ९) याच्या अपहरणानंतर खून करून मृतदेह शेतात फेकण्यात आल्याने खळबळ उडाली. अतिशय क्रूरपणे खून केला गेल्याने ही घटना नरबळीतून किंवा आपसांतील शत्रुत्वातून घडल्याची शक्‍यता आहे.

पंचनाम्यानंतर पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी जळगावला रवाना केला. तज्ज्ञ समितीसमक्ष शवविच्छेदन झाल्यावर सायंकाळी जळगावातच मृतदेह दफन करण्यात आला. एकुलत्या देखण्या मुलाच्या मृत्यूने आई कोमात गेली, तर वडील हतबलतेतून ‘माझी दुश्‍मनी नाही...कोई मुर्गा नही काटेगा एैसा मेरे बच्चे के साथ हुवा...’ असे म्हणत बडबड करीत होते.   

लाखेच्या बांगड्या तयार करण्याचे काम करणारे बब्बू ललन सय्यद कुटुंबासह वर्षभरापूर्वीच टोणगाव येथे राहण्यासाठी आले. सय्यद कुटुंबीय मूळ उत्तर प्रदेशातील फत्तेपूर सिक्री येथील असून, नागपूर येथे अनेक वर्षांपासून वास्तव्यास होते. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर बब्बू यांचे दुसरे लग्न झाले असून, दुसरी पत्नी पिंकीकडून त्यांना मुलगा व मुलगी अशी अपत्ये आहेत. धूलिवंदनाच्या दिवशी (२१ मार्च) ‘इसम’ घराच्या कंपाऊंडमधून बेपत्ता झाला. दुसऱ्या दिवशी पाचोरा रोडवरील नानासाहेब देशमुख यांच्या केळीबागेत विवस्त्र अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. पायातील चपलेवरून त्याची ओळख पटली, तरी चेहरा व शरीर छिन्नविछिन्न असल्याने शंका नको म्हणून वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनापूर्वी एकदा परत वडील बब्बू सय्यद यांना मृतदेह दाखविला.

मृत बालकाच्या पाठीवर जन्मजात व्रण असल्याची खात्री झाल्यावर शवविच्छेनास सुरवात झाली. विच्छेदन आटोपल्यावर मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात आला. जळगाव शहरातील अजिंठा चौकातील कब्रस्थानात या मुलावर कुटुंबीयांतर्फे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

नरबळी की खुन्नस?
मृत इसमच्या पाठीवर जन्मजात व्रण, गौरवर्ण देखणी आकर्षक शरीरयष्टी होती. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाला तो बेपत्ता झाला. पोर्णिमेनंतरचा दिवस असल्याने अघोरी कृत्याद्वारे नरबळीची शक्‍यता आणि कौटुंबिक वादात मृत इसमचे वडील बब्बू सय्यद यांचा दुसरा विवाह असून, पहिल्या पत्नीपासून चार मुले आहेत. कौटुंबिक कलहातून त्यांनी एक वर्षापूर्वी नागपूर सोडून भडगाव गाठले होते. पारिवारिक खुन्नसमधून हा प्रकार झाला का? याचाही पोलिस शोध घेत आहेत. 

श्‍वान घुटमळला
घटनेचे गांभीर्य ओळखत अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव घटनास्थळी दाखल झाले. निरीक्षक धनंजय येरूळे यांच्यासह फॉरेन्सिक पथक, श्‍वानपथकही घटनास्थळी दाखल झाले. श्‍वानपथकाने घटनास्थळावरून जवळच एका दारू गुत्त्यावर जाऊन नंतर मृत इसमच्या मित्राच्या घराची गल्ली अशा तीन जागांवर घुटमळून परतला. घटनास्थळावरून बरेच पुरावे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, संशयिताचा शोध सुरू आहे.  

साहब! इन्साफ चाहिए
मृत इसमचे पिता बब्बू सय्यद यांच्या म्हणण्यानुसार आपले कुणाशीही वैर नाही. पोलिस उगाच शंका घेताय. माझ्या नात्यातील नागपूर, मुंबई येथील नातेवाइकांना मी बोलावून घेतले. पोलिसांनी चौकशी करावी. मी कधीच कुठे जात-येत नाही. घरबसल्या माझे काम असून घरातून पानटपरीपर्यंतच येणे- जाणे आहे. ‘कोई मुर्गा नही काटता एैसा मेरे मासूम बच्चे को काट दिया है, मुझे इन्साफ चाहिऐ’ असे वारंवार बब्बू सय्यद बडबडत होता.

घटनेचा सखोल तपास सुरू आहे. नरबळीची शक्‍यता कमी असून, कौटुंबिक वादासह इतर वेगवेगळ्या पद्धतीने तपास सुरू आहे. मृत मुलासोबत गैरकृत्य केले गेल्याची शक्‍यता असून, परिसरातील गंजोटली, नशेखोरांची माहिती घेण्यात येत आहे. विविध पथके तयार करण्यात आली असून, लवकरच गुन्हा उघड करून संशयितास अटक करू.
- प्रशांत बच्छाव, अप्पर पोलिस अधीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com