खिशातले पंचवीस लाख खर्चून निकुंभेकरांना पांझरेचे पाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

मेहरगावपर्यंत पांझरेची मुख्य पाटचारी आली आहे. येथुन निकुंभेपर्यंत पाणी नेण्यासाठी सात कि.मी.ची पाटचारी करणे आवश्यक आहे. पुर्णतः खडकाळ भागातून पाटचारी नेण्याचे काम जिल्हा परीषद सदस्य किरण पाटील यांनी केले आहे. दीड महिन्यापासून दिवसरात्र जेसीबीने चारी कोरली जात आहे. पाटील हे भर उन्हात तिथे तळ ठोकून असतात. स्वखर्चातून हे काम सुरु आहे. सुमारे पंचवीस लाखावर खर्च झाला आहे.

निकुंभे (ता.धुळे)-  येथील सालदार्‍या धरणात पांझरेचे पाणी पोहचणे अशक्य आहे. तांत्रिक बाजू स्पष्ट करीत प्रशासकीय अधिकार्‍यांनी नकार दिला. नकार दिल्याने निधीची उपलब्धता होण्याची आशा मावळली. असे असतांनाही स्वतः सर्व्हे केले. जाणकार शेतकर्‍यांचा सल्ला घेतला. मनाशी खुणगाठ बांधली. स्वतःच्या खिश्यातील पैसे खर्च करण्याचा निर्धार केला. अन पाटचारीचे काम सुरु केले. दीड महिन्याच्या दिवसरात्र परीश्रमातून पाटचारी पुर्णत्वास येत आहे. येत्या आठ दिवसांत पुर्ण होईल. यासाठी सुमारे पंचवीस लाख खर्च झाले आहेत. हे धरण भरल्याने पाचशे एकर शेती ओलिताखाली येणार आहे. पांझरेचे पाणी नेण्यासाठी  माजी कृषी सभापती आणि विद्यमान जिल्हा परीषद सदस्य किरण पाटील हे आशेचा किरण ठरले आहेत.

पंचवीस लाखावर खर्च
मेहरगावपर्यंत पांझरेची मुख्य पाटचारी आली आहे. येथुन निकुंभेपर्यंत पाणी नेण्यासाठी सात कि.मी.ची पाटचारी करणे आवश्यक आहे. पुर्णतः खडकाळ भागातून पाटचारी नेण्याचे काम जिल्हा परीषद सदस्य किरण पाटील यांनी केले आहे. दीड महिन्यापासून दिवसरात्र जेसीबीने चारी कोरली जात आहे. पाटील हे भर उन्हात तिथे तळ ठोकून असतात. स्वखर्चातून हे काम सुरु आहे. सुमारे पंचवीस लाखावर खर्च झाला आहे.

सालदार्‍या भरणार
पांझरेच्या पाण्यातून सालदार्‍या धरण भरण्याचे अशक्यप्राय स्वप्न पुर्णत्वास येणार आहे. याच पाटचारीतून लहानसहान बंधारेही तुडुंब भरण्यासाठी त्यांच्याजवळ नियोजन आहे. प्रशासकीय अधिकार्‍यांनी अशक्य असल्याचे सांगितल्या नंतर पाटील यांनी शक्य करुन दाखविले आहे. नोकरशाहीच्या नकारात्मकतेला ठोस उत्तर दिले आहे.

पाणी चळवळीचे प्रणेते
माजी कृषी सभापती पाटील यांनी मेहरगाव गटाचा पुर्णतः चेहरामोहरा बदलून टाकला आहे. अक्कलपाड्यातून निमडाळेचे धरण आणि गोंदूर तलाव भरणे. पाटचार्‍यांतून शेतीशिवारातील लहानमोठे बंधारे भरण्याच्या कामी त्यांचे मोठे योगदान आहे. गेल्या तीन वर्षांपासून मेहरगाव, निमडाळे, गोंदूर येथे पाणी टंचाई भासू दिलेली नाही. दुष्काळाची मागणी करण्यापेक्षा गटातील दुष्काळ संपविण्यासाठी पाच वर्ष अविरत काम सुरु ठेवले आहे. किरण पाटील यांची जिल्ह्यात पाणी चळवळीचे प्रणेते म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

दिलेला शब्द पाळण्यासाठी...
निकुंभेला पांझरेच्या पाणी मिळेल असा शब्द दिलेला होता. तो पाळण्यासाठी कटीबध्द आहे. तो शब्द तडीस नेत आहोत, असे जिल्हा परीषद सदस्य पाटील यांनी सांगितले.

Web Title: kiran patil solves Water issue in Nikumbhe