बी. जे. मार्केटमध्ये सकाळीच वेल्डिंग दुकानदारावर चाकूहल्ला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जून 2019

राहुलकडे होता चाकू 
नुसतेच लघुशंका येथे करू नका, असे सांगितल्यावरून सुरेशनामक तरुणाने त्याचा साथीदार राहुलला बोलावून घेतल्यावर राहुलने चाकूसह हल्ला चढविला. माझ्याकडे कामाला असलेल्या ताहेरच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्याने मध्ये सहभाग घेत हातात चाकू धरला नसता, तर कदाचित आज मीही जिवंत नसतो, अशी प्रतिक्रिया भेदरलेल्या शकील शाह यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

जळगाव - शहरातील बी. जे. मार्केटमधील ‘शाह इंजिनिअरिंग’ या वेल्डिंग दुकानासमोर लघुशंका करणाऱ्या तरुणाला हटकल्याने वाद होऊन दुकानदारासह सहकाऱ्यावर चाकूहल्ला करण्यासह मारहाण करण्यात आल्याची घटना आज सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, जिल्हापेठ पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

जोशीपेठेतील रहिवासी शकीलशाह नासीरशाह (वय ५५) यांचे बी. जे. मार्केट परिसरात ‘शहा इंजिनिअरिंग’ म्हणून लेथमशिन-वेल्डिंग दुकान आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास नेहमीप्रमाणे शकील दुकान उघडून स्वच्छता करीत असताना एक तरुण दुकानासमोरील भिंतीवर लघुशंका करत होता. त्यामुळे शकील यांनी त्यास विनंती करीत ‘आम्हाला वास येतो’, असे सांगितले. त्यावर संबंधिताने शकील यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. थोड्याच वेळात त्याने त्याच्या साथीदाराला बोलावून दोघांनी शकील यांच्यावर हल्ला चढवून बेदम मारहाण करणे सुरू केले. मारहाण करतानाच धारदार चाकू काढून शकील यांच्यावर धावून जाताना तेथे काम करणाऱ्या ताहेर शे. अकबर (वय ४५) याने चाकूधारी तरुणाचा हात धरल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, ताहेर यांच्या उजव्या हातात चाकू खुपसला गेल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी आरडाओरड होऊन शेजारील दुकानदारांनी मदतीसाठी धाव घेतल्यावर सुरेश व राहुल नावाच्या हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. जखमींना शकील व ताहेर यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Knief Attack on Welding Shop Owner Crime