45 हजार कामगारांना उघडावे लागणार बॅंकेत खाते

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

नाशिक : जिल्ह्यातील विविध उद्योगांत काम करीत असलेल्या सुमारे 45 हजार कामगारांना 3 डिसेंबरपूर्वी बॅंकेत खाते उघडावे लागणार आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार निमा हाउस आणि सिन्नर एमआयडीसीत खाते उघडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

नाशिक : जिल्ह्यातील विविध उद्योगांत काम करीत असलेल्या सुमारे 45 हजार कामगारांना 3 डिसेंबरपूर्वी बॅंकेत खाते उघडावे लागणार आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार निमा हाउस आणि सिन्नर एमआयडीसीत खाते उघडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने संघटित आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची बॅंकेत खाते उघडण्याचा आदेश काढला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बॅंक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध उद्योग संस्थांत काम करणाऱ्या कामगारांचे खाते उघडण्याबाबतचे नियोजन करण्यात आले. बॅंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंक, युनियन बॅंक, देना बॅंक, आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि बॅंक ऑफ इंडिया यांच्यातर्फे नाशिकच्या निमा हाउस येथे, तर सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने सिन्नर औद्योगिक क्षेत्रात 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान कामगारांची बॅंक खाती उघडण्यासाठी व्यवस्था केली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक अशोक चव्हाण यांनी ईएसआयसी (कर्मचारी राज्य बीमा निगम) आणि निमा कार्यालयाला नुकतीच भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार श्री. चव्हाण यांनी "निमा'च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून बॅंक काउंटर सुरू करण्याचे नियोजन केले आहे. बॅंक खाते उघडू इच्छिणाऱ्या कामगारांनी आधारकार्ड आणि ओळखपत्राच्या सत्यप्रतीसह तीन छायाचित्रे सोबत आणावीत. दुपारी 12 ते 8 या वेळेत ही सुविधा उपलब्ध असेल, असे आवाहन जिल्हा अग्रणी बॅंक आणि निमातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: labors shall open bank accounts