पाच योजना होऊनही दोन पिढयाच्या नशीबाला पाझर फुटेना!

yeola
yeola

येवला : कितीही प्रयत्न करा नशीब फाटकं असले की या प्रयत्नांना नेहमीच अपयश येते. असाच काहीसा अनुभव येवल्यातील आवर्षण प्रवण व दुष्काळी राजापूरकर पाणीटंचाईच्या बाबतीत वर्षानुवर्षे घेत आहे. मागील ३०-३५ वर्षात गावाला तब्बल पाच पाणीपुरवठा योजनांचे भाग्य लाभलं मात्र उन्हाळा सुरू झाला की या योजना माना टाकून पडतात आणि गावकऱ्यांना थेंबभर पाण्यासाठी पुन्हा वणवण गावकुसाबाहेर भटकावे लागतं. काहींच्या कुटुंबात दुसरी तर काहींची तिसरी पिढीच्या हा प्रश्न या भागाच्या नशिबी चिटकून राहिला अाहे.

उंच डोंगरी भागातील राजापूर हे गाव वर्षानुवर्षे दुष्काळाच्या खाईत लोटलेले आहे.पाऊस पडला तर येथील शेती आठमाही पिकते नाहीतर चारमाही पिकने देखील जिकरीचेच... अशा स्थितीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न किती भयानक असेल त्याची कल्पनाही करवत नाही.दुष्काळी असूनही येथील लोक नाना उद्योगी असल्याने पाच हजार लोकसंख्येचे हे गाव मात्र आर्थिक संपन्न आहे.याचमुळे पाण्याच्या शोधात हजारो बोरवेल्स या भागात झाले परंतु त्यातून पाण्याऐवजी फुफाटाच बाहेर आला हि शोकांतिकाच आहे.वाड्या वस्त्यांवर कुणाच्या तरी विहिरीला किंवा बोअरवेलला थोडेफार पाणी असल्याने नागरिक शेती ओस ठेवून त्या अल्पशा पाण्यावर आपली गरज भागवतात.गाव व परिसरातील चित्र अतिशय भयानक व वेदनादायी असते व यावर्षीही आहेच.

टँकर मिळेना...पाणी विकत घेण्याची वेळ!
सद्यस्थितीत गावांसह वाड्या वस्त्यांवरील रहिवाशांचे प्रचंड हाल सुरू आहे.या वर्षी अल्प पावसामुळे डिसेंबरमध्येच पाणी टंचाईने डोकेवर काढले आहे.आज मितीस तर पाचपन्नास विहिरींच्या आड एखाद्या विहिरीला पाणी आहे. सध्या गावाला लोहशिंगवे (ता.नांदगाव) येथून पाणीपुरवठा करणारी पाणी योजना कार्यान्वित आहे. मात्र लोहशिंगवे शिवारातील योजनेची विहीर आणि नव्याने खोदलेला बोअरवेल देखील कोरडाठाक पडल्याने पाणी योजनेला महिन्यापासून थेंबभरही पाणी आलेले नाही.

गावातील हातपंपांना देखील माना टाकल्याने ग्रामस्थ हंडे व ड्रम घेऊन मिळेल त्या वाड्यावर वस्तीवर जाऊन गरजेपुरत्या पाण्याची शोधाशोध करत आहेत. थोडे फार पाणी असलेले शेतकऱ्यांना देखील स्वतःची गरज भागवायची असल्याने ते इतरांना पाणी देतातच असे नाही आणि पाणी भरू देणारेही बोटावर मोजण्याइतकेच आहे. यामुळे अनेक नागरिक वापरासाठी ५० रुपये दराने एक टीप भरून विकत घेत आहेत तर पिण्यासाठी रोज ३० रुपयांचा पाणी जार विकत घेऊन पाण्याची गरज भागविण्याची नामुष्की आली आहे.योजनेमुळे गाव कागदोपत्री टँकरमुक्त असले तरी आता योजनाच कुचकामी ठरल्याने ग्रामपंचायतीने गावात वाडया वस्त्यांना रोज चार टँकरद्वारे पाणी पुरवठय़ाची मागणी केलेली आहे.मात्र ढिम्म प्रशासनामुळे अजूनही टँकर सुरू झालेले नसल्याने पाणी विकत घेण्याची आणि महिला मैल भटकंती करून शोधण्याची वेळ गावावर आली आहे.

पाच योजना कोरड्या..आता सहावी नशिबी!
येथे १९८० पासून पाच योजना झाल्या पण त्या कोरडय‍ाच आहेत. १९९० पासून या गावाला टंचाईच्या झळा अधिक बसू लागल्या आहेत. त्यापूर्वी गावाला बसस्थानकावरील विहिरीवरून पाणी योजना होती तर यानंतर मारुती मंदिरासमोर झालेल्या टाकीतून पाणीपुरवठा योजना राबविली गेली.साधारणतः १९९५ च्या दरम्यान गांधी चौकामध्ये पाण्याची टाकी करून तेथून गावाला पाणी दिले जात होते.मात्र कालौघात या योजना कमकुवत पडू लागल्याने २००३ मध्ये कायमस्वरूपीचा पर्याय म्हणून मुबलक पाणी असलेल्या लोहशिंगवे येथून गावासाठी पाणी योजना करण्याचे निश्चित झाले.यासाठी येथील जेष्ठ नेते नरेंद्र दराडे व डॉ. सुधीर जाधव यांनी निधी उपलब्ध करून देत तर ग्रामस्थांनीही लोकवर्गणी उभी करत ही योजना पूर्णत्वास नेली.

मात्र पहिल्यापासून योजना साडेसातीच्या फेऱ्यात अडकली असून पावसाळा व हिवाळा वगळता इतर चार ते पाच महिने प्रत्येक उन्हाळ्यात योजना कोरडीठाक झालेली असते.यावर पर्याय म्हणून विहीर खोलीकरण तसेच नव्याने बोअरवेलही खोदण्यात आले. परंतु उन्हाळ्यातील साडेसाती संपायचं नाव घेत नाही.गावाला पुरेसे पाणी मिळावे म्हणून पुन्हा पूरक पाणीपुरवठा योजना राबवून २००९
मध्ये दीड लाख लिटरची स्वतंत्र पाणी टाकी बांधण्यात आली पण उन्हाळयातील संकटावर उपाय मात्र सापडलेला नाही.

आता सहाव्या योजनेची तयारी...
लोहशिगव्यांची योजना कुचकामी ठरू लागल्याने तसेच लोकसंख्याही वाढत असल्याने आता वडपाटी येथील बंधाऱ्यातून पुन्हा नव्याने योजना करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने केला आहे.याशिवाय माणिकपूज धरणातून या भागातील टंचाईग्रस्त गावांसाठी देखील एक प्रादेशिक योजना जिल्हा परिषद स्तरावर प्रस्तावित आहे. भविष्यात या दोन्हीपैकी एका योजनेचे पाणी राजापूर करांच्या नशिबी आहे. मात्र ही योजनाही अगोदरच्या सहा योजनेसारखीच पाझरली जाणार कि पाणीदार ठरणार हे मात्र येणारा काळच सांगेल..!!

"पाणी योजनेचा उद्भव आटल्याने योजना बंद असून गावासाठी टँकरचा प्रस्ताव दिलेला आहे. याशिवाय वडपाटी बंधाऱ्यातून नव्याने पाणी योजनेचा प्रस्ताव देखील तयार केला आहे, असे ग्रामविकास अधिकारी आर.एस. मंडलिक यांनी सींगितले. 

"उन्हाळ्यात पुरेल इतके पाणी या भागात नसल्याने गावठाणात साठवण तलाव करून त्याद्वारे गावाला आरोच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा.अशा योजनेमुळे गावाला बारमाही पाणी मिळेल व ग्रामपंचायतीला उत्पन्नाचा स्त्रोतही मिळू शकेल, असे सानप दत्ता यांनी सांगितले.

"उन्हाळा आला की आमच्यासमोर पहिला प्रश्न राहतो तो पाण्याचा.त्यात योजना बंद,हातपंप कोरडे होऊन जातात.आम्हाला मैल-मैल पाण्याचा शोध करावा लागतो.यामुळे गावात कायमस्वरूपी पाणी मिळावे. तसेच आता तातडीने टँकरने पाणीपुरवठा सुरू व्हावा, अशी मागणी उमाबाई इप्पर यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com