बोगस खरेदीखत करून जमीन हडपली

प्रा. भगवान जगदाळे
शनिवार, 7 एप्रिल 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : शिवाजीनगर, भामेर शिवारातील गट क्रमांक १२७/१८ मधील ९ हेक्टर, ५२ आर एवढे क्षेत्र असलेली जिरायत शेतजमीन बोगस खरेदीखत करून हडप केल्याची तक्रार शिवसेनेचे साक्री तालुका उपप्रमुख व निजामपूरचे रहिवासी त्रिलोक केशव दवे यांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव पाटील, मनीषा पाटील आदी उपस्थित होते.

निजामपूर-जैताणे (धुळे) : शिवाजीनगर, भामेर शिवारातील गट क्रमांक १२७/१८ मधील ९ हेक्टर, ५२ आर एवढे क्षेत्र असलेली जिरायत शेतजमीन बोगस खरेदीखत करून हडप केल्याची तक्रार शिवसेनेचे साक्री तालुका उपप्रमुख व निजामपूरचे रहिवासी त्रिलोक केशव दवे यांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव पाटील, मनीषा पाटील आदी उपस्थित होते.

सन २००५ मध्ये १० वर्षाच्या कराराने शेतकरी त्रिलोक दवे यांनी 'सर्जन रियालिटीज लिमिटेड, पुणे' ह्या कंपनीच्या शाहू शंकर भोसले या प्रतिनिधीच्या नावे साठेखत करून घेतले होते. सदर शेतजमीन दहा वर्षानंतर विनामोबदला परत करण्याचे ठरले होते. जमीन ताबेगहाण म्हणून श्री. दवे यांना कंपनीकडून ५ लाख ९५ हजार रूपये उसनवार मिळाले होते. त्यानंतर त्यांनी १० नोव्हेंबर २०१७ या दिवशी कंपनीचे प्रतिनिधी जनार्दन बाळकृष्ण जगदाळे यांना गुलाबराव पाटील व प्रवीण वाणी यांच्या समक्ष परत दिली.

त्यानुसार सुझलॉन कंपनीतर्फे काम करणारे कर्मचारी राजेंद्र भामरे व जनार्दन जगदाळे यांनी रद्दबातल लेख दस्त (संपूर्ण मोबदल्याचे ताबा साठेखत) २० नोव्हेंबर २०१७ रोजी दुय्यम निबंधक, साक्री यांच्या कार्यालयात नोंदणी करण्याचे ठरविले. रद्दबातल लेख दस्त करायच्या बहाण्याने त्यांनी स्टॅम्प पेपर व इतर सर्व कागदपत्रांवर तक्रारदाराच्या सह्या करून घेतल्या व सहा महिन्यात शेतजमीन तुमच्या नावे होईल असे सांगण्यात आले. त्यानुसार २१ फेब्रुवारीला श्री. दवे यांनी ऑनलाईन ७/१२ उतारा काढला असता त्याच्यावर राजेंद्र सहादू भामरे व रेखा राजेंद्र भामरे अशी नावे आढळून आली. जमीन खरेदी न करून देताही जमीन संबंधितांच्या नावे झालीच कशी.? याबाबत श्री. दवे यांनी आश्चर्य व्यक्त केले.

त्यानंतर भामेरच्या तलाठ्याकडे 'ड' पत्रकाची नोंद काढली असता रद्दबातल लेख दस्त सोबत बोगस व बेकायदेशीर खरेदीखत करून त्याच्यावर तक्रारदाराच्या सह्या करून घेतल्याचे आढळले. संबंधितांनी कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना व माहिती न देता संपूर्ण साडेनऊ हेक्टर जमिनीचे खरेदीखत नोंदवून घेत श्री. दवे यांना भूमिहीन केले आहे. सदर जमीन खरेदीची रक्कम २५ लाख ७१ हजार एवढी दाखवण्यात आलेली असून त्यांना अद्याप एक पैसाही मोबदला देण्यात आला नसल्याची माहिती श्री. दवे यांनी दिली आहे. राजेंद्र भामरे व जनार्दन जगदाळे यांनी संगनमताने अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा सर्व बेकायदेशीर प्रकार केला असून त्यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून शेतजमीन परत मिळावी व दिशाभूल करून केलेले बेकायदेशीर खरेदीखत रद्द व्हावे. अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे श्री. दवे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

२० नोव्हेंबर २०१७ रोजी केलेल्या रद्दबातल लेख दस्तचा क्रमांक ३७८५ असून नियमानुसार त्यानंतर २१ दिवसांनी खरेदीखत करता येते. परंतु फक्त अर्ध्या तासाच्या अंतराने दिशाभूल करून केलेले ३७८६ क्रमांकाचे दुसरे बेकायदेशीर खरेदीखत अमान्य करत येत्या महिनाभराच्या आत ते रद्द झाले नाही. तर पत्नी व दोन्ही मुलांसह आपल्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरणार नसल्याचे व जीवाला काही बरेवाईट झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार सर्जन रियालिटीज कंपनीचे प्रतिनिधी व संबंधित अधिकारी राहतील. महिन्याभरात जमीन परत न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशाराही त्यांनी दिला असून त्यास शासन-प्रशासन जबाबदार राहील असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह प्रांताधिकारी, तहसीलदार आदींनाही त्यांनी निवेदने दिली असून पालकमंत्री दादा भुसेंनाही आपण निवेदन देणार असल्याचे त्यांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.

Web Title: land grabbed by buying a bogus aggriment