लांडोरखोरी उद्यान ‘पिकनिक डेस्टिनेशन’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

जळगाव - महापालिकेकडून उपेक्षित राहिलेल्या जळगाव शहरासाठी विकासातील आशेचा किरण म्हणून दोन वर्षांपूर्वी लांडोरखोरी उद्यानाचा विकास करण्यात आला. मोहाडी रस्त्यावरील विस्तीर्ण परिसरात विकसित झालेले जैवविविधतेने नटलेले हे उद्यान म्हणजे जळगावकरांसाठी रम्य पर्वणीच ठरत आहे. उद्यानातील शंभरावर प्रजातींचे पक्षी, प्राणी आणि वृक्षराजी या उद्यानाचे विशेष आकर्षण आहे. 

जळगाव - महापालिकेकडून उपेक्षित राहिलेल्या जळगाव शहरासाठी विकासातील आशेचा किरण म्हणून दोन वर्षांपूर्वी लांडोरखोरी उद्यानाचा विकास करण्यात आला. मोहाडी रस्त्यावरील विस्तीर्ण परिसरात विकसित झालेले जैवविविधतेने नटलेले हे उद्यान म्हणजे जळगावकरांसाठी रम्य पर्वणीच ठरत आहे. उद्यानातील शंभरावर प्रजातींचे पक्षी, प्राणी आणि वृक्षराजी या उद्यानाचे विशेष आकर्षण आहे. 

दोन- अडीच वर्षांपूर्वी वन विभागाने मोहाडी रस्त्यावर लांडोरखोरी उद्यानाची निर्मिती केली आहे. मोहाडी रस्त्यावर वनविभागाच्या सुमारे ७० हेक्‍टर अर्थात २०० एकर जागेवर जवळपास एक कोटी ८० लाख रुपये खर्चून हे उद्यान विकसित करण्यात आले. महापालिकेच्या आर्थिक स्थितीमुळे शहरातील उद्यानांची स्थिती बिकट असताना हे उद्यान जळगावकरांसह परिसरातील गावांमधील नागरिकांसाठी ‘पिकनिक डेस्टिनेशन’ ठरले आहे. 

जैवविविधतेने नटलेला परिसर
या उद्यानात रानटी डुक्कर, नीलगाय, ससे, लांडगे, ससा, मुंगूस, खोकड, वावर, दगड पाल, साधी पाल, उद्यान सरडा, शामेलीयन, धामण, कवड्या, तस्कर आदी वन्य प्राण्यांचे अस्तित्व आढळते. तर ८० ते १०० देशी- विदेशी पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. उद्यानात येणाऱ्या नागरिकांसाठी निरीक्षण मनोरे, निसर्ग माहिती केंद्र, पिण्याचे पाणी उपलब्ध आहेत. 

सर्वधर्मीय वनाची निर्मिती 
सर्वधर्मीय वन अशी नवीन संकल्पना येथे राबविण्यात आलेली असून त्यात रामायण वन, रामायणात उल्लेख असलेल्या अनेक वनस्पती या उद्यानात आहेत. महाभारत उद्यान, अशोक उद्यान, जैन उद्यान, इस्लाम उद्यान, ख्रिस्ती उद्यान, त्रिफळा उद्यान, बौद्ध उद्यान, गणेश आराधनेत लागणाऱ्या विविध वनस्पतींचे गणेश वन, पंचवटी वन, गुलाब उद्यान, नंदन वन, लाख वन, १२ राशी व २७ नक्षत्रे नुसार विविध राशींसाठी लाभदायक असलेले वृक्ष याठिकाणी आहेत. तसेच भौगोलिक माहितीसह नक्षत्र उद्यान, अंजीर उद्यान, ताड उद्यान, वेळू (बांबू ) उद्यान निर्माण करण्यात आले आहे. 

या वनस्पती, वृक्षांचा समावेश
औषधांचे गुणधर्म असलेल्या औषधांची झाडे लावण्यात आली आहे. यात खैर, नीम, अंजन, बोर, बाभूळ, काटेसावर, शेवगा, आपटा, हेंकळ यांसारखे वनस्पतींची झाडे या उद्यानांमध्ये झाडांची माहिती व त्यांचे औषधी गुणधर्मांची माहिती नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. वनविभागाने येथे पाच ते सहा वर्षात जाणीवपूर्वक प्रयत्न करून हिरवा पट्टा विकसित केला आहे.

Web Title: Landorkhori Vanodyan Picnin Destination