शिवसेनेतर्फे वीज कंपनीवर कंदील मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

वाढीव बिले, नादुरुस्त मीटरसह भारनियमनाचा निषेध; अधिकाऱ्यांना निवेदन

धुळे - विजेचा वापर नसतानाही शहरातील नागरिकांना मिळणारी अव्वाच्या सव्वा बिले, नादुरुस्त मीटर, सातत्याने होणारे भारनियमन, कमी-अधिक दाबाने वीजपुरवठ्यामुळे विजेची उपकरणे जळण्याचे वाढलेले प्रमाण या वीज कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करत शिवसेनेच्या महानगर शाखेतर्फे आज वीज कंपनीच्या कार्यालयावर कंदील मोर्चा काढत कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. कारभारात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

या संदर्भात वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता के. डी. पावरा यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की शहरातील नागरिकांना काही महिन्यांपासून अव्वाच्या सव्वा बिले मिळत आहेत. ज्या ग्राहकांना ३०० ते ४०० रुपये वीजबिल येत होते त्यांना ती दीड ते दोन हजार रुपयांपर्यंतची दिली गेली आहेत. अनेक ग्राहकांचे मीटर नादुरुस्त झाले आहेत.

भारनियमनाचे प्रमाणही वाढल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय कमी-अधिक दाबामुळे विजेची उपकरणे जळण्याचे प्रमाणही वाढले आहे. याबाबत शिवसेनेकडे नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींचे निवारण करावे, योग्य रकमेची बिले द्यावीत, नादुरुस्त मीटर बदलून द्यावेत, भारनियमन बंद करावे, कमी-अधिक दाबाने होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा.

एकीकडे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उत्तर प्रदेशाला वीज देण्याच्या गोष्टी करतात, तर दुसरीकडे महाराष्ट्रात भारनियमनामुळे शेतकरी हवालदिल आहेत. हा विरोधाभास थांबवून सुरळीत वीजपुरवठा करावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या. वीज कंपनीच्या कारभारात त्वरित सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनात देण्यात आला.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख सतीश महाले, भूपेंद्र लहामगे, छोटू खरात, हेमा हेमाडे, रेखा साळुंखे, सुनंदा तावडे, प्रतिभा सोनवणे, सुनील बैसाणे, देविदास लोणारी, भगवान गवळी, संदीप सूर्यवंशी आदींसह कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

Web Title: Lantern rally by shivsena on electricity company