लासलगावला कांद्याच्या दरात बाराशे रुपयांनी घसरण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

लासलगाव - लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत लाल (रांगडा) कांद्याच्या भावात 1200 रुपयांची मोठी घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, लासलगाव बाजार समितीच्या आवारात 21 हजार 400 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. किमान भाव 901 रुपये तर जास्तीत जास्त 1 हजार 905 रुपये, तर सर्वसाधारण भाव 1 हजार 601 रुपये होता.

मध्य प्रदेश, गुजरातमधील भावनगर, महुआ, दोराजी, येथून गेल्या आठवड्याच्या तुलनेत डबल आवक झाली आहे. पुणे, सोलापूर, चाकण येथून गावठी कांद्याची मोठी आवक सुरू झाली आहे. त्यात केंद्राच्या एमईपीचे धरसोड धोरणामुळे दरात मोठी घसरण झाली आहे.
कांदा उत्पादकांनी केंद्रीय वाणिज्य व्यापार मंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निर्यातीवरील सर्व निर्बंध उठविण्याबाबत निवेदन दिले आहे. जिल्ह्यात अजून मोठ्या प्रमाणात लाल कांदा शिल्लक आहे. येणाऱ्या काळात उन्हाळ कांद्या बाजारात दाखल होईल. एमईपी धोरणात केंद्राने ठोस निर्णय घेतल्यास पाहिजे तेवढ्या प्रमाणात कांदा निर्यात होऊन देशांतर्गत मागणी पूर्ण होईल व परकीय चलन मिळेल व बाजारभाव पातळी स्थिर राहण्यासाठी मदत होईल.

Web Title: lasalgaon news nashik news onion rate decrease