27 दिवसांत अडीच हजार अतिक्रमणांचे काम तमाम!

atikraman.jpg
atikraman.jpg

येवला : शहरात पालिकेचा पदभार स्विकारल्यानंतर मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी हाती घेतलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत मागील २७ दिवसांत तब्बल अडीच हजार अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. या मोहिमेमुळे शहरातील गुदमरलेल्या मुख्य रस्त्यांसह गल्ली बोळांनी मोकळा श्वास घेतला असून सगळीकडे आलेले बकाल पण हटले आहे.

शहराच्या वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते, मात्र मागील तीन आठवड्यात बरेच चित्र बदलले असून शिस्तिचे दर्शन घडले आहे. शनी पटांगणातील बेशिस्त दुकानांची, भाजीबाजाराची व वाहनांची मांडणी खटकल्याने सर्वप्रथम या भागाला नांदूरकर यांनी शिस्त लावली. पुढे भाजीबाजारात विक्रेत्यांना एका ठिकाणी आणून विस्कळीतपणा दूर केला. वर्दळीमुळे बकाल झालेल्या विंचूर चौफुलीला देखील सर्व अतिक्रमणे, टपऱ्या हटवत  महामार्गावरील पोलिस चौकी देखील हटवली. यामुळे गर्दीचे येवला शहर आता मोकळे दिसू लागले असून विस्कळीत होणाऱ्या वाहतुकीतून शहरवासियांची सुटका झाली.

यानंतर आठवडाभर शहरात सर्व मुख्य गल्ल्यांमध्ये फिरून नांदूरकर स्वयंस्फूर्तीने वाढीव अतिक्रमणे काढण्याचे आव्हान केले होते, त्याला प्रतिसाद मिळत आठशे पेक्षा जास्त नागरिकांनी स्वतःहून पुढे येत आपली अतिक्रमणे काढली होती. तरीही अनेकांचे वाढीव बांधकामे राहिल्याने त्यांनी बुधवार (ता.१६) ते शनिवार (ता.१९) पर्यंत विशेष मोहीम राबवून दीड हजारांवर अतिक्रमणे हटविली आहे. शहरातील सर्वच वर्दळीच्या भागात ही मोहिम राबवत दुकानांचे शेड, पायऱया, ओटे, विना ठरावाच्या टप्प्या, गटारीवरील सर्व बांधकामे, वॉलकंपाऊंड अशा स्वरुपाची अतिक्रमणे हटविल्याने आता रस्ते मोकळे दिसत आहेत.

विशेष म्हणजे नागरिकांनी एकमेकांची अतिक्रमणे दाखविल्याने ती काढणे पालिकेला सोपे गेले, तसेच दोनशे पेक्षा जास्त तक्रारी अर्ज या दरम्यान आल्याने अशा अतिक्रमणांवरही पालिकेने हातोडा चालवला.  एक जेसीबी, सहा ट्रॅक्टर, हातोडय़ाची टीम यासह या मोहिमेत दररोज सकाळी चार व सायंकाळी चार तास ७५ कर्मचारी कार्यरत होते. 

 तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनीही काही ठिकाणी मोहिमे दरम्यान हजेरी लावली. विभाग प्रमुख अशोक कोकाटे, बापूसाहेब मांडवडकर, घनश्याम उंबरे, अभिजित इनामदार, अशितोष सांगळे, सुनील जाधव, पवन परदेशी, नितीन परदेशी, सुनील संसारे, अशोक कसारे, मुरली जगताप, राजेंद्र जांभुळकर यांच्यासह सर्व कर्मचारी व सफाई कामगारांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. “नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटविल्याने व मोहिमेला सहकार्य केल्याने व्यापक स्वरुपात मोहीम राबवणे शक्य झाले आहे. यापुढे पालिकेचे एक रॅपिड टास्क फोर्स अतिक्रमणांवर नजर ठेवून राहणार असून सार्वजनिक अतिक्रमणे काढण्यासाठी पालिका कायम तत्पर राहील. मोकळ्या झालेल्या जागेवर पालिका ठराव करून टप्प्यांसाठी या जागेचा विनियोग करणार आहे.” असे मुख्याधिकारी येवला संगीता नांदूरकर यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com