सरकारचे शेवटचे वर्ष उजाडले तरी भूसंपादनाचीच चर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

नाशिक - मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनावरच अजूनही चर्चा सुरू आहे. सोमवारी (ता. १४) सहव्यवस्थापकीय संचालकांनी घेतलेल्या बैठकीत नाशिकचे भूसंपादनाचे कामकाज पूर्णत्वास आणण्याची सूचना दिली गेली. दरम्यान, बैठकीत संपादित जमिनी अन्य बाबींसंदर्भात दिलेल्या मोबदल्याविषयी प्रशासनाकडे तक्रारी झाल्या आहेत. मात्र, त्याविषयी कुठलीही चर्चा आढावा बैठकीत झाली नाही. एकीकडे या प्रकल्पाच्या उद्‌घाटनाची तयारी सुरू असताना सुरू असलेला प्रकार पाहता सरकारच्या शेवटचा वर्षात भूसंपादनाचीच चर्चा सुरूच राहील असे चित्र आहे.    

समृद्धी महामार्ग भूसंपादन स्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी राज्य रस्ते महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी बैठक घेतली. त्यात नाशिक व नगरमधील कामाच्या आढाव्यात ९० टक्के कामकाज पूर्ण झाल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून देण्यात आली. त्यात राहिलेले भूसंपादन पूर्णत्वास नेणे तसेच संपादित जागांवर काय कामकाज सुरू झाले याविषयी चर्चा झाली. जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकाऱ्यांसह समृद्धी विभागाचे अधिकारी व कर्मचारी बैठकीत सहभागी झाले होते.

आठ लाख मिळालेच नाहीत...
समृद्धी महामार्गाच्या संपादनात पैसेवाटपात गैरप्रकार पुढे येऊ लागले आहेत. फसवणूक झाल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. मात्र उद्‌घाटन तयारीच्या नियोजनात तूर्त तरी संबंधित तक्रारीचा निपटारा करण्यास यंत्रणेला वेळ नसल्याची माहिती पुढे येत आहे. इगतपुरी तालुक्‍यात काही गटांसंदर्भात अशा तक्रारी आल्या आहेत. बेलगाव तऱ्हाळे येथील गट क्रमांक ५९६ शेतीत टाकलेल्या जलवाहिन्यांच्या मोबदल्याचा विषय तिष्ठत आहे. संबंधिताने १७ डिसेंबरला तक्रार करूनही त्यावर निर्णय झालेला नाही. खंडू आव्हाड यांचे जमिनीचे मूल्यांकन नऊ लाख २२ हजारांचे असताना त्यांना केवळ ६४ हजार ५१५ रुपयेच दिले गेले आहेत. शेतीतील जलवाहिन्यांचा तब्बल आठ लाख ५८ हजार ३२० रुपयांचा मोबदला संबंधितांना मिळालेलाच नसल्याचा प्रकारही पुढे आला आहे.

कुठे मेहेरबानी...
दुसऱ्या एका प्रकारात इगतपुरी विभागात धामणी उपविभागात एका साडेतीन हेक्‍टरच्या गटात गाव नमुना १२ मध्ये सिंचनाची सुविधा नसल्याचे उल्लेख असताना संबंधितांना भूसंपादनापोटी सिंचनाची सुविधा दाखवीत अतिरिक्त पैसे देण्यासारखा प्रकार झाला आहे. मेहेरबानी दाखवीत पैसे दिले गेलेल्या प्रकाराबाबत ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’सारख्या प्रकाराबाबत प्रशासकीय पातळीवर कुठल्याही चर्चा नसल्याने बैठकीत केवळ प्रकल्प पुढे रेटण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येते.

Web Title: last year of the government only discussion of land acquisition