सटाण्यात शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ वकील संघाचा दोन तास रास्ता रोको 

रोशन खैरनार
रविवार, 10 जून 2018

सटाणा : शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर हमीभाव द्यावा व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यांसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी १ जूनपासून पुकारलेल्या देशव्यापी संपाला पाठींबा देत सटाणा वकील संघाने आज( रविवार ता.१०)  येथील बसस्थानकासमोर विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर कांदे फेकून रास्ता रोको आंदोलन छेडले. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचा लढा असाच सुरु राहील असा संतप्त इशारा वकील संघातर्फे यावेळी शासनाला देण्यात आला. तब्बल दोन तास सुरु असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होती.

सटाणा : शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर हमीभाव द्यावा व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यांसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी १ जूनपासून पुकारलेल्या देशव्यापी संपाला पाठींबा देत सटाणा वकील संघाने आज( रविवार ता.१०)  येथील बसस्थानकासमोर विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर कांदे फेकून रास्ता रोको आंदोलन छेडले. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचा लढा असाच सुरु राहील असा संतप्त इशारा वकील संघातर्फे यावेळी शासनाला देण्यात आला. तब्बल दोन तास सुरु असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होती.

आज सकाळी ११ वाजता वकील संघाचे अध्यक्ष पंडितराव भदाणे यांच्या नेतृत्वाखाली सदस्य व शेकडो शेतकऱ्यांनी बसस्थानकासमोर एकत्रित येऊन रास्ता रोको आंदोलन छेडल्याने वाहतूक ठप्प झाली. शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे ओतून शासनाचा निषेध व्यक्त केला. आंदोलकांनी सत्ताधारी भाजपा शासनविरोधी केलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता. यावेळी बोलताना एड.पंडितराव भदाणे म्हणाले, शेतमालाला जोपर्यंत दीडपट हमीभाव दिला जात नाही तोपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याचे प्रश्न सुटणार नाही. २०१४ मध्ये लोकसभा निडणुकीत भाजपने मते मागताना स्वामिनाथन आयोग लागू करण्याचे वचन शेतकऱ्यांना दिले होते, मात्र सत्तेत आल्यानंतर शासनाला याचा संपूर्ण विसर पडला आहे.

शेतकऱ्यांचा संप म्हणजे स्टंट असल्याचे सांगून देशाचे कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने परदेश दौऱ्यावर असून मुख्यमंत्री फडवणीस पक्षाच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत. 'संपर्क फॉर समर्थन' हे अभियान राबवताना भाजप नेते मोठ्या उद्योगपती व कलावंताची भेट घेत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही, ही अत्यंत दुदैवी बाब आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा इशारा श्री. भदाणे यांनी दिला. यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक पगार म्हणाले, राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली, मात्र तीही फसवीच. या कर्जमाफीपासून अनेक शेतकरी अद्यापही वंचितच आहेत.

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभावाची देण्याचं आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारनं आता शेतकऱ्यांना हमीभाव देणं अशक्य असल्याचं सांगून आपला खोटारडेपणा उघड केला आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या भावनांचा अंत न पाहता येत्या दोन दिवसात सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून कायदा हाती घेत आंदोलन तीव्र करतील. त्यानंतर होणाऱ्या परिणामास सर्वस्वी शासनच जबाबदार राहील. यावेळी रेखा शिंदे, वसंत सोनवणे, नाना भामरे, भास्कर सोनवणे आदींची भाषणे झाली. 

आंदोलनात हिरामण सोनवणे, सी.एन.पवार, ए.एल.पाटील, रवींद्र पाटील, रेखा शिंदे, मनीषा ठाकूर, सौ.चिंधडे, सुजाता पाठक, एस.आर.आहिरे, वसंत सोनवणे, संजय सोनवणे, आर.एम.जाधव, के.टी.ठाकरे, पी.पी.भामरे, अशोक जगताप, सी.एन.अहिरे, विष्णू सोनवणे, नंदू सोनवणे, निलेश डांगरे, गंगाधर सोनवणे, संजय शिंदे, धर्मेंद्र सोनवणे, कौतिक निकम, रामदास निकम, यशवंत सोनवणे, एड.क्षीरसागर, बबलू सोनवणे, डोंगर पगार, शिवाजी भदाणे, दादाजी पगार, गोरख बेडीस, प्रभाकर पवार, संग्राम राजे, भास्कर सोनवणे, नवल सावकार, सुभाष सावकार, नाना सावकार, अनिल निकम, गंगाधर भामरे, मोठाभाऊ भामरे, वसंत भदाणे, बळीराम निकम, महेंद्र निकम, ज्ञानदेव गायकवाड, अरुण डोंगरे, चंद्रशेखर पवार, दिनेश निकम, गोकुळ निकम आदींसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलकांनी उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांना निवेदन दिले. 

 

Web Title: lawyer's block road two-hour in support of farmers community