Nandurbar News : घरफोडीचा गुन्हा अवघ्या 8 तासांत उघड | lcb and Nandurbar city police arrested burglary criminals in 8 hours crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nandurbar Crime News : घरफोडीचा गुन्हा अवघ्या 8 तासांत उघड

Nandurbar News : बुधवारी (ता. ३) घडलेल्या पटेलवाडीतील धाडसी घरफोडीतील गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने अवघ्या आठ तासांतच बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून आठ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. (lcb and Nandurbar city police arrested burglary criminals in 8 hours crime news)

२ ते ४ एप्रिलदरम्यान पटेलवाडी येथील शेख युसूफ शेख चांद यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटामधून आठ लाख ९७ हजार २५० रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरून नेली होती. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

गुन्हा घडल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली.

त्याच वेळी श्री. शेख यांच्या घरात भाडेकरू म्हणून तीन वर्षांपासून राहत असलेला जुबेर इब्राहिम शाह यानेदेखील त्याच्या राहत्या घरात चोरी झाल्याबाबत सांगितल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली.

पोलिस अधीक्षक पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर व नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तत्काळ गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत आदेश दिले.

जुबेर शाह याच्या घरात झालेल्या घरफोडीच्या घटनास्थळाची पोलिस अधीक्षक पाटील पाहणी करीत असताना जुबेर याला काही प्रश्न विचारण्यात आले असता, जुबेर शाह त्याच्या घरात चोरी झाल्याबाबत बनाव करीत असल्याचा संशय आला.

पोलिस अधीक्षक पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे पथक तयार करून जुबेर शाहाकडे सखोल विचारपूस करण्याबाबत आदेशित केले.

जुबेरने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास शहर पोलिस ठाण्यात आणून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता ही चोरी केल्याची माहिती दिली. त्याने चोरी केलेले आठ लाख ९७ हजार २५० रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने व रोकड असा मुद्देमाल त्याच्याच घरातून काढून दिला.

कारवाई पथक

ही कामगिरी पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, नंदुरबार उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलिस उपनिरीक्षक सागर आहेर, पोलिस नाईक राकेश मोरे, भटू धनगर, पोलिस अंमलदार अभय राजपूत, योगेश जाधव यांच्या पथकाने केली आहे. पोलिस अधीक्षकांनी पोलिसांना रोख बक्षीस जाहीर केले.