Dhule Crime News : एलसीबीकडून तिघा चोरट्यांना अटक; तपासात न्याहळोदलाही कारवाई | LCB arrested three people who stole materials and tractors from power company dhule crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LCB arrested three people who stole materials and tractors from  power company dhule crime news

Dhule Crime News : एलसीबीकडून तिघा चोरट्यांना अटक; तपासात न्याहळोदलाही कारवाई

Dhule News : वीज कंपनीचे साहित्य आणि ट्रॅक्टर चोरणाऱ्या येथील संशयित दोघांसह तिघांना एलसीबीने अटक केली. वीज कंपनीच्या पोलचे सी चॅनल १३ मेस चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी वायरमन वासुदेव अरुण मालचे यांनी धुळे तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. (LCB arrested three people who stole materials and tractors from power company dhule crime news)

एलसीबीकडून तपास सुरू असताना फजलू रहेमान अन्सारी (रा. गल्ली क्रमांक १४, धुळे) आणि अब्दुल बारी अब्दुल शकूर अन्सारी (रा. गल्ली क्रमांक ५, धुळे) यांनी गुन्हा केल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली.

त्यांनी पथकाची नियुक्ती केली. संशयितांचा शोध घेत असताना दोघे संशयित रिक्षामधून (एमएच १८, एन ७१७८) ऐंशी फुटी मार्गाकडे जाताना त्यांना पथकाने पकडले. चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. रिक्षाने सी चॅनल भंगार बाजारात विक्रीसाठी ते नेत होते. एकूण ५३ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

ट्रॅक्टर चोरीचा छडा

दरम्यान, शिंदखेडा पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या ट्रॅक्टर चोरीचा छडाही एलसीबीने लावला. चिमठाणे (ता. शिंदखेडा) येथील राहुल बाबूराव पाटील यांचे ट्रॅक्टर (एमएच १८, झेड ४८४१) सहा मेस चोरट्याने लंपास केले. हा गुन्हा गणेश आसाराम कोळी (रा. देगाव, ता. शिंदखेडा) याने केल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गणेश कोळी हा चोरीचे ट्रॅक्टर घेऊन न्याहळोद (ता. धुळे) येथे विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली. एलसीबी पथकाने न्याहळोद येथे गणेश कोळी याला ताब्यात घेतले. चार लाख ६५ हजार ६५ रुपयांचे ट्रॅक्टर जप्त केले.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, धनंजय मोरे श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, मयूर सोनवणे, कैलास महाजन, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, देवेंद्र ठाकूर, राजू गिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Dhulecrimethief