आधी सत्तेतून बाहेर पडा; मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा!

Leader of the Opposition Radhakrishna Vikhe Patil criticized Shiv Sena
Leader of the Opposition Radhakrishna Vikhe Patil criticized Shiv Sena

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला असून, अगोदर या दळभद्री सरकारमधून बाहेर पडा; मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा, असे शिवसेनेला सुनावले आहे.

काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा फैजपूर येथे प्रारंभ करताना ते बोलत होते. या विशाल सभेला संबोधित करताना विखे पाटील यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर बरसताना ते म्हणाले की, शिवसेनेने आजवर २३५ वेळा सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे दिले. पण शेवटपर्यंत सत्ता सोडली नाही. हे सरकार लोकविरोधी आहे, शेतकरी विरोधी असे वाटत असेल तर शिवसेनेने तात्काळ या सरकारमधून बाहेर पडून दाखवावे, असे आव्हान विरोधी पक्षनेत्यांनी उद्धव ठाकरेंना दिले.

भाजप-शिवसेना सरकारने गांधी जयंतीला महात्मा गांधींप्रती दाखवलेल्या खोट्या कळवळ्याचा धागा धरून राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, हे सरकार गांधीजींचे नाव घेते. पण प्रत्यक्षात त्यांनी गांधीजींच्या विचारांना हरताळ फासण्याचे काम केले आहे.महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेची द्विसुत्री दिली. पण हे सरकार खरे कधी बोलत नाही आणि खोटे बोलण्यात यांचा हात कोणी धरू शकत नाही. १०० गोबेल्स मेले असतील, तेव्हा भारतीय जनता पक्ष जन्माला आला असेल, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

गांधीजींच्या आत्मचरित्राचे नाव ‘माझे सत्याचे प्रयोग’ आहे. मात्र गांधीजींचे नाव घेणारे हे सरकार सारे असत्याचेच प्रयोग करते आहे. मोदी स्वतःला चौकीदार म्हणवून घेतात. पण हे ‘जागते रहो’ म्हणण्याऐवजी ‘भागते रहो’म्हणणारे चौकीदार आहे. म्हणूनच विजय मल्ल्या, निरव मोदी, मेहूल चोक्सी पळाले. आता नितीन संदेसरा नावाचा आणखी एक ‘महापुरूष’ ५ हजार ७०० कोटी रूपयांचा घोटाळा करून पळून गेला. पण पंतप्रधान एक शब्द बोलायला तयार नाहीत. या सरकारकडे जनतेच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नाही.

देशाच्या आणि राज्याच्या सोडा पण जळगाव जिल्ह्यातील प्रश्नांवरही या सरकारकडे उत्तर नाही. भाजपने दिलेले आश्वासन दिलेले केळी संशोधन केंद्र केव्हा स्थापन करणार? कापूस संशोधन केंद्र केव्हा तयार होणार? जळगावचे पोलीस प्रशिक्षण केंद्र का पळवले गेले? खान्देश विकास महामंडळ स्थापन करणार की नाही? अशा कोणत्याही प्रश्नाला हे सरकार उत्तर देत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्ह्याला न्याय देऊ शकणार नाही. एकनाथ खडसेंनी भाजपसाठी रक्त आटवले. पण जो भारतीय जनता पक्ष एकनाथ खडसेंचा होऊ शकला नाही, तो जळगाव जिल्ह्याचा काय होणार? असा सवाल करून स्व. मधुकरराव चौधरी यांच्या काळातील विकासाचे युग पुन्हा परत आणायचे असेल तर जळगाव जिल्ह्याने काँग्रेसला भरभरून पाठिंबा द्यावा, असे आवाहन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com