तीन गावांच्या हद्दीवर बिबट्याची दिवाळी, दोन जनावरे फस्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

रामपुरा, निंबायती आणि न्हावीतांड्याच्या हद्दीवर बिबट्याने सोमवारी मध्यरात्री पासून दहशत बसवून दोन जनावरांना फस्त करून दिवाळी साजरी केली आहे. दरम्यान, सोमवारी दुपारपर्यंत बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असल्याने मजुरांची धांदल उडाली होती.

सोयगाव : रामपुरा, निंबायती आणि न्हावीतांड्याच्या हद्दीवर बिबट्याने सोमवारी मध्यरात्री पासून दहशत बसवून दोन जनावरांना फस्त करून दिवाळी साजरी केली आहे. दरम्यान, सोमवारी दुपारपर्यंत बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असल्याने मजुरांची धांदल उडाली होती.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला, परंतु बिबट्याचा बंदोबस्त करण्यास वनविभागाच्या पथकाला अपयश आले आहे. सोयगाव परिसरातील रामपुरा,निंबायती आणि न्हावीतांड्याच्या शेती शिवाराच्या हद्दीवर चवताळलेल्या बिबट्या ठाण मांडून बसल्याने या परिसरातून कोणालाही हालचाल करण्याची संधी बिबट्याने दिली नव्हती.

दरम्यान, न्हावितांडा शिवारातून शेतीच्या कामांना जात असलेल्या महिला मजुरांना या बिबट्याने तासभर स्थानबद्ध केल्याचे मजुरांनी सांगितले.  तत्पूर्वी पहाटे चार वाजताच बिबट्याने रामपुरा शिवारातील मंजू गणू राठोड यांच्या गट क्रमांक - 98 मध्ये दावणीला शेतात बांधलेल्या जनावराचा फडशा पाडला. त्यानंतर, काही वेळात न्हावितांड्यात भर दिवसा शेळीचा फडशा पाडला आहे. एकाच दिवसात बिबट्याने या भागात दोन जनावरांचा फडशा पाडला असतांना वन विभागाकडून केवळ पंचनाम्याची खैरात दिल्याचे पशुधारकांकडून बोलले जात आहे.

ऐन दुष्काळात जनावरांचा फडशा- आधीच सोयगाव तालुक्यात गंभीर दुष्काळ असतांना, पशुपालकांना जनावरे सांभाळणे कठीण जात असतांना,चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने जनावरांना शेतातच बांधावे लागत आहे. परंतु शेती शिवारात बिबट्याचा हल्ला जनावरांसाठी जीवघेणा ठरत असतांना शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वनविभाग एकीकडे केवळ पंचनामा करून मोकळा होत असतांना पशु पालकांना मात्र नुकसानी पोटी दमडीही मिळत नसल्याने इकडे आड, तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.

आठवडाभरात पंधरा जनावरांचा फडशा
सोयगाव हद्दीतच कंकराळा, सोयगाव, गलवाडा, रावेरी, जरंडी, निंबायती, बहुलखेडा, वेताळवाडी, आदि भागात बिबट्याने आठवडाभरात पंधरा पेक्षा जास्त जनावरांचा फडशा पाडला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करूनही अद्यापही वनविभागाच्या मदतीपासून पशुपालक वंचित आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी नसल्याने अडचण
सोयगावला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे पद पंधरा दिवसापासून रिक्त असल्याने प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी अजिंठा यांच्याकडे आर्थिक प्रभार नसल्याने सोयगाव वनविभागाचा कारभार डळमळीत झालेला आहे.त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी अभावी शेतकऱ्यांना नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहावे लागत असल्याने नुकसानीचे प्रस्ताव धूळखात पडून आहे.

Web Title: leopard attack on Two Animals