कांद्याच्या चाळीत बिबट्याच्या मादीकडून दोन बछड्यांना जन्म

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

रात्रीतून नेणार बछडे
शेडमध्ये असलेल्या बछड्यापासून काही अंतरावरच मादी आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. मादी रात्रीतून तिचे बछडे घेऊन जाईल, अशी शक्‍यता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. तोपर्यंत वन कर्मचारी त्याच ठिकणी ठाण मांडून आहेत.

नाशिक - गिरणारेपासून काही अंतरावर असलेल्या धोंडेगावातील शेतकऱ्याच्या कांद्याच्या शेडमध्ये मध्यरात्री बिबट्याच्या मादीने दोन बछड्यांना जन्म दिला. ही बाब शेतकरी जेव्हा सकाळी शेडकडे जाऊ लागला तेव्हा मादीच्या गुरगुरण्याने समोर आली. मात्र या प्रकाराने परिसरात घबराट पसरली आहे.

धोंडेगावापासून सुशील कोरडे यांचा मळा आहे. त्यांच्या मळ्यात कांद्याची चाळ आहे. परिसरात संततधार सुरू आहे. याच चाळीत बुधवारी (ता. ७) मध्यरात्री बिबट्याच्या मादीने दोन बछड्यांना जन्म दिला. श्री. कोरडे जेव्हा सकाळी शेडकडे जाऊ लागले, त्या वेळी शेडपासून दोनशे-तीनशे फुटांवरील शेतात दडून बसलेल्या मादीच्या गुरगुरण्याने तो घाबरला. शेडमध्ये पाहिले असता त्या ठिकाणी दोन बछडे दिसले. ते पाहून त्यांची पाचावरच धारण बसली. त्यांनी घटनेची माहिती वन विभागाला दिली. त्यानुसार गिरणारेचे नितीन गायकर, वन विभागाचे शांताराम हंबरे यांच्यासह कर्मचारी दाखल झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Calf Born in Onion Storage