बापरे! बिबट्या पुन्हा आला! 

Leopard came again in girna area
Leopard came again in girna area

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : गिरणा परिसरात पुन्हा बिबट्याची भीती निर्माण झाली आहे. बहाळ (ता. चाळीसगाव) शिवारातील ऋषिपांथा भागात बिबट्याने एकाच शेतकऱ्याच्या आठ दिवसात नऊ बकऱ्यांचा फडशा पडल्याच्या घटनेमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या भागात बिबट्या असल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात सिद्ध झाल्याने त्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला. हा बिबट्या नरभक्षक होण्याआधीच त्याला जेरबंद करण्याचे पाऊल वन विभागाने उचलले आहे. 

नरभक्षक बिबट्याला ठार केल्यानंतर ग्रामीण भागात विशेषतः गिरणा नदीकाठच्या गावांच्या परिसरात बिबट्या आढळून आल्याने पुन्हा बिबट्याने भीती निर्माण केली आहे. बहाळ (ता. चाळीसगाव) येथील ऋषिपांथाजवळ शेती असलेल्या इंद्रजित देवरे यांच्या शेतातील बिबट्याने आठ दिवसात तब्बल नऊ बकऱ्या फस्त केल्या. हल्ल्यात ठार झालेल्या बकऱ्यांचे डॉ. संदीप भट यांनी शवविच्छेदन केले, तर वनपाल ए. बी. जोहरे यांनी पंचनामा केला. सुरवातीला हा हल्ला दुसऱ्या कुठल्या तरी वन्यप्राण्याने केल्याचा संशय व्यक्त होत होता. मात्र, या भागात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात तीन दिवसांपूर्वी भल्या पहाटे बिबट्या कैद झाल्याने हा हल्ला बिबट्याने केला असावा, याला वन विभागाने दुजोरा दिला आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

बकरी ठेवून लावला पिंजरा

सध्या या भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा ठेवण्यात आला. पिंजऱ्यातील बकरी खाण्यासाठी बिबट्या पुन्हा येईल, या दृष्टीने वन विभागाने नियोजन केले आहे. या ठिकाणी आमदार उन्मेष पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बोरसे, तहसीलदार कैलास देवरे, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांनी भेट देऊन पाहणी केली. मेहुणबारे परिसरातही काही दिवसांपूर्वी कुत्र्याचा फडशा पाडत एकाला बिबट्याचे दर्शन झाले होते.

आम्ही आजूबाजूच्या परिसरात जनजागृती म्हणून माहितीपत्रके वाटली आहेत. शेतात जाताना एकटे न जाता घोळक्‍याने जावे. काम करतांना मोबाईलवर गाणे वाजवावे आदी महत्त्वाच्या सूचना ग्रामस्थांना दिल्या आहेत. ग्रामस्थांनी शेतात सावधानता बाळगावी.
 - ए. बी. जोहरे, वनपाल (जुवार्डी भाग) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com