मुलांच्या बिछान्यात बिबट्याचे पिलू...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

इगतपुरी - तालुक्‍यातील धामणगावमध्ये एका कुटुंबात आज एक नवा "पाहुणा' बालगोपाळांसोबत चक्क मच्छरदाणीत जाऊन झोपला. या "पाहुण्या'ला अचानक पाहताच मात्र सर्वांची अक्षरशः त्रेधातिरपीट उडाली. पहाटे चार वाजता घडलेल्या या घटनेतील हा "पाहुणा' दुसरा तिसरा कुणी नसून बिबट्याचे तीन महिन्यांचे पिलू आहे!

इगतपुरी - तालुक्‍यातील धामणगावमध्ये एका कुटुंबात आज एक नवा "पाहुणा' बालगोपाळांसोबत चक्क मच्छरदाणीत जाऊन झोपला. या "पाहुण्या'ला अचानक पाहताच मात्र सर्वांची अक्षरशः त्रेधातिरपीट उडाली. पहाटे चार वाजता घडलेल्या या घटनेतील हा "पाहुणा' दुसरा तिसरा कुणी नसून बिबट्याचे तीन महिन्यांचे पिलू आहे!

वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह धाव घेऊन पिलाला ताब्यात घेतले. गेल्या महिन्यात याच गावात विहिरीत बिबट्या पडला होता, तर दोन दिवसांपूर्वी एक बिबट्या झोपडीत सापडला होता. बिबट्या दिसण्याचे प्रमाण वाढले असून, वन खात्याने आवश्‍यक उपाय करावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

धामणगाव येथे मनीषा बर्डे या पती आणि दोन मुलांसोबत भरवस्तीत राहतात. आज पहाटे चारच्या सुमारास त्यांनी दरवाजा उघडल्यानंतर बाहेर असलेले बिबट्याचे तीन महिन्यांचे पिलू घरात घुसले. मात्र, त्यांच्या ते लक्षात आले नाही. घरात बर्डे यांची दोन मुले मच्छरदाणीत झोपली होती. बिबट्याचे पिलू मुलांच्या बिछान्यात अलगद शिरले आणि चक्क झोपी गेले. पहाटे पाच वाजता मनीषा बर्डे यांना या आगंतुक पाहुण्याची चाहूल लागल्याने त्यांची भंबेरी उडाली. त्यांनी तत्काळ गावकऱ्यांच्या मदतीने वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.

इगतपुरीचे वन परिक्षेत्राधिकारी आर. पी. ढोमसे यांचे मार्गदर्शन घेऊन गोरक्षनाथ जाधव यांनी वनरक्षक रेश्‍मा पाठक, संतोष बोडके, बबलू दिवे, भोराबाई खाडे, फैजअली सय्यद, दशरथ निरगुडे, श्रावण निरगुडे, रामदास बगड, मुरलीधर निरगुडे यांच्यासह धाव घेऊन जाळ्यांच्या साहाय्याने पिलाला ताब्यात घेतले.

बिछान्यात बिबट्याचे पिलू असल्याचे समजताच 15 मिनिटांत दखल घेऊन त्याला ताब्यात घेतले. बिबट्या मानवी जीवनासाठी घातक नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
- गोरक्षनाथ जाधव, वन परिमंडळ अधिकारी

Web Title: Leopard in Child Bed