
अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याची मादी ठार झाली. शिंदखेडा वनविभागाने बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून, उत्तरीय तपासणीनंतर अकराला बिबट्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
शिरपूर (जि. धुळे) : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिंदखेडा तालुक्याजवळील गावादरम्यान 14 नोव्हेंबरला रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याची मादी ठार झाली. शिंदखेडा वनविभागाने बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून, उत्तरीय तपासणीनंतर अकराला बिबट्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मृत बिबट्याचे वय तीन ते चार वर्षे आहे. रात्री अकराला भक्ष्य शोधण्यासाठी महामार्ग ओलांडत असताना अवजड वाहनाने त्याला धडक दिल्याचा संशय आहे. तेथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मृत बिबट्या आढळला. त्यांनी बिबट्याच्या मृतदेहाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर वनविभागाला माहिती मिळाली.
शिंदखेडा येथील आरएफओ किरण माने यांनी बिबट्याचा मृतदेह शिंदखेडा येथे हलवला आहे. महामार्गालगत काही जणांनी गुरे बांधण्यासाठी तात्पुरते गोठे तयार केले आहेत. तेथे भक्ष्य शोधण्यासाठी बिबट्या जात असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सत्रासेन (ता.चोपडा) येथील जंगलातील नैसर्गिक अधिवास धोक्यात आल्याने बिबट्यासारखे प्राणी आश्रयासाठी तापी नदीच्या काठावरील टेकड्या व दाट बाभूळ वनांमध्ये शिरल्याची शक्यता आहे. गतवर्षी शिरपूर तालुक्यात चिलारे शिवारात शिकारीसाठी आलेल्या बिबट्याला ठार केल्याची घटना घडली होती.