अन्‌ शिकारी बिबट्याचीच झाली शिकार!

Leopard get killed in Cimathane
Leopard get killed in Cimathane

चिमठाणे : शेळ्यांची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्यावर स्वतःच शिकार होण्याची वेळ आली. शेळ्यांवर हल्ला करण्यास सज्ज झालेला बिबट्या तारेच्या कुंपणात अडकला. यात त्याच्या गळ्याला फास लागल्याने त्याचा मृत्यू झाला. हुंबर्डे (ता. शिंदखेडा) येथे ही दुर्घटना घडली. वन विभागाने बिबट्याचे शव विच्छेदन करत शासकीय सोपस्कार पार पाडले. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले.

हुंबर्डे (ता. शिंदखेडा) येथील काही दिवसांपासून पाळीव पशूंच्या शिकारीला चटावला होता. यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालकांनी आपापली जनावरे शाबूत राखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. शेतकरी कायसिंग रायसिंग भिल (वय 70) यांनीही आपल्या शेळ्या सुरक्षित राहाव्यात म्हणून शेळ्यांच्या गोठ्याला तारेचे कुंपण केले होते.

शिकारी बिबट्या काल (ता. 15) रात्री तापी नदीकाठावरील कायसिंग भिल यांच्या शेळ्यांच्या गोठ्याकडे गेला. शिकारीसाठी त्याने तारेचे कुंपण ओलांडण्यासाठी उडी घेतली असता तारेच्या कुंपणात अडकून त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी आठला ही घटना उघडकीस आली. बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. आज सकाळी ग्रामस्थांनी वनरक्षक पी. एस. पाटील यांना मोबाईलवरून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

शिरपूरचे सहाय्यक वनसंरक्षक अमितराज जाधव, वनक्षेत्रपाल किरण माने, वनपाल डी. बी. पाटील, वनपाल गुजर, वनरक्षक प्रभाकर पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा केला. मृत बिबट्या तीन ते चार वर्षांचा असून, त्याची लांबी दोन मीटर दोन सेंटिमीटर व उंची सव्वा मीटर आहे.

बिबट्याने अर्धवट खाल्लेली शेळीही शिंदखेडा येथील वन विभागाच्या कार्यालयात आणण्यात आली होती. पशुधन सहाय्यक आयुक्त डॉ. एस. जी. सोनवणे, सहाय्यक आयुक्त डॉ. हितेंद्र पवार, ए. जी. बुवा व परिचर जितेंद्र गिरासे यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. आज दुपारी अडीचला शिंदखेडा येथील वन विभागाच्या कार्यालयात बिबट्यावर अंत्यसंस्कार झाले.


हुंबर्डे येथे गुरुवारी सकाळी बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी भेट दिली असता बिबट्या हा मोटारसायकलच्या क्लबच वायरच्या तारेच्या कुंपणात मध्यभागी अडकलेला आढळला. त्याचा श्वास गुदमरून व पोटात रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला आहे. बिबट्याच्या मृत्यूस कारणीभूत म्हणून कायसिंग भिल यांना ताब्यात घेतले असून, योग्य ती कारवाई केली जाईल.
- अमितराज जाधव, सहाय्यक वनसंरक्षक, शिरपूर


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com