PHOTOS : गावकऱ्यांना वाटले सापडेल जाळ्यात...पण 'तो' ही हुशार होता...

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

नांदूर भागात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढलेली असली तरी त्याचा वावर असलेल्या मानूर परिसरात अद्यापही बऱ्यापैकी शेतमळे टिकून आहेत. त्याच्या अस्तित्वाने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. तसेच त्याच्या दहशतीने शेतातील कामे ठप्प झाली आहेत. सायंकाळनंतर शुकशुकाट होत असल्याचे चित्र आहे.

नाशिक : औरंगाबाद रोडवरील मानूर परिसरातील मळे परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य आहे. रविवारी (ता. 8) सकाळी शेतात मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या विनीत अनवट या मुलाला बिबट्या दिसला होता. बिबट्याच्या अस्तित्वाने या भागात दहशत पसरली असून, सायंकाळनंतर सर्वत्र शुकशुकाट होत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर वन विभागाने रविवारी (ता. 8) पिंजरा लावला. रात्री बिबट्या पिंजऱ्याजवळ आलाही; परंतु सावजाची शिकार न करताच निघून गेल्याचे परिसरातील नागरिकांनी ठशांच्या आधारे सांगितले. 

Image may contain: plant, outdoor and nature

दहशत दुसऱ्या दिवशीही कायम.... 
मानूर शिवारातील अनवट वस्तीजवळ एका मुलाला बिबट्याचे दर्शन झाल्यावर वन विभागाने परिसरात पिंजरा ठेऊन त्यात सावज म्हणून शेळीही ठेवली होती. सोमवारी (ता. 9) सकाळी शेतकरी पिंजऱ्यात बिबट्या अडकला की नाही, हे बघायला गेले. मात्र रात्री बिबट्या पिंजऱ्याजवळ आला; केवळ विहिरीवर पाणी पिऊन गेल्याच्या खुणा आढळल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत वन विभागास नागरिकांनी कळविले असून, पिंजऱ्याची जागा बदलून सायंकाळी पुन्हा शेळी ठेवणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Image may contain: plant, outdoor and nature

परिसरातील भटक्‍या कुत्र्यांची संख्या कमी झाली असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नागरिकांनी महिलांसह लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांची काळजी घेण्यास सांगितले आहे. याशिवाय पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना वन विभागाने दिल्या आहेत. 

Image may contain: night and outdoor

शेतीची कामे ठप्प 
दरम्यान, नांदूर भागात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढलेली असली तरी बिबट्याचा वावर असलेल्या मानूर परिसरात अद्यापही बऱ्यापैकी शेतमळे टिकून आहेत. बिबट्याच्या अस्तित्वाने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. बिबट्याच्या दहशतीने शेतातील कामे ठप्प झाली आहेत. सायंकाळनंतर शुकशुकाट होत असल्याचे चित्र आहे.

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard terror in manur Nashik Marathi News