शिंदेमध्ये विहिरीत आढळला बिबट्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

नाशिक रोड - नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावातील झाडे मळ्यातील दिनकर खाडे यांच्या विहिरीत रविवारी (ता. ११) दुपारी एकच्या सुमारास विहिरीत बिबट्याचा बछडा आढळून आला. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या सिंधूबाई खाडे यांची धावपळ झाली. मात्र, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बछड्याला तब्बल तीन तासांच्या अथक परिश्रमाने विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. विहिरीबाहेर पडताच बछड्याने धूम ठोकल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

रविवारी दुपारी सिंधूबाई खाडे कांद्याच्या शेतात गवत काढत होत्या. त्यांना तहान लागल्याने त्या विहिरीजवळ पाणी काढण्यासाठी गेल्या. त्यांनी बछडा विहिरीत पडल्याचे पाहताच त्यांची धावपळ उडाली. याबाबत त्यांनी पती दिनकर खाडे यांना माहिती दिली. श्री. खाडे यांनी त्वरित वन विभागाला माहिती दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाडे मळ्यात धाव घेऊन पाहणी केली. वनसंरक्षक विजयसिंग पाटील, वनपाल रवींद्र सोनार, गोविंद पंढरे, विजय पाटील, अनिल साळवे, वनमजूर सोमनाथ निंबेकर, संपत निंबेकर यांनी विहिरीत दोरीची सीडी सोडून बछड्याला वर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण बछडा सीडीने वर येत नसल्याचे लक्षात येताच विहिरीत बाज सोडून हळूवारपणे त्या बछड्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. तीन तासांच्या अथक परिश्रमाने वन विभागाला बछड्याला बाहेर काढण्यात यश मिळाले. वर येताच बछड्याने धूम ठोकली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. घटनास्थळी पोलिसपाटील रवींद्र जाधव, दिनकर खाडे, सुनील खाडे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, अनेक दिवसांपासून शिंदे-पळसे पंचक्रोशीत रात्री घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. एका बाजूला बिबट्याची दहशत, तर दुसऱ्या बाजूला वीज वितरण कंपनीची मनमानी सुरू आहे. रात्री दोनच्या सुमारास थ्री फेज शेतकऱ्यांसाठी वीज दिली जात आहे.

शेतकरी बिबट्याच्या दहशतीने आणि वीज कंपनीच्या गलथान कारभाराने त्रस्त आहे. पिके पाण्याअभावी नष्ट होऊ नये, यासाठी रात्री उशिरा शेतकरी पिकाला पाणी देण्यासाठी शेतावर जातो. दिनकर खाडे यांच्यासह सर्वच शेतकऱ्यांना शेतात बिबट्या, रानडुकर व इतर हिंस्र प्राण्यांच्या पायांचे ठसे आढळून येत होते. संबंधित शेतकऱ्यांनी वारंवार वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पिंजरा लावण्याची मागणी केली. मात्र, वन विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने रविवारी बिबट्याचे सर्वांनाच दर्शन झाले. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पळसे साखर कारखाना, शेवगे दारणा, मोहगाव, बाबळेश्‍वर परिसरात पिंजरे लावावेत, अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Leopard in Well