‘पेग’ कमी भरला म्हणून खून करणाऱ्यांना जन्मठेप 

peg
peg

जळगाव - शहरातील मेहरुण तलावाजवळील शिवाजी उद्यानात गेल्यावर्षी झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून, तिसऱ्या संशयितास न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. ग्लासात दारूचा पेग कमी भरला या करणाने झालेल्या वादातून ही हत्या झाली होती.

शिरसोली नाक्‍याजवळील हॉटेलवर २४ एप्रिल २०१८ ला सोनू गोरखसिंग साळुंखे, मच्छिंद्र तुकाराम नाथ (वय-२३), मोहन ऊर्फ प्यारेमोहन चंद्रकांत जाधव (वय १९) व गुड्डू ऊर्फ कानशा वहाब शेख (वय-२२ ) असे चौघे मद्यप्राशन करण्यासाठी बसले होते. यावेळी, सोनू साळुंखे याने पेग बनवताना गुड्डूच्या ग्लासात कमी दारू टाकली या कारणावरून चौघांमध्ये हाणामारी झाली होती. घटना घडली तेव्हा सोनूचा मामा दीपक ऊर्फ बंडू प्रतापसिंग पाटील याने चौघांचे भांडण सोडवत सोनूला घरी पाठवले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मेहरुण तलाव परिसरात वनविभागाच्या निर्मनुष्य जागेवर सोनूचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोनूचा मामा दीपक पाटीलच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

तिघांना अटक 
मृतदेह सापडल्यावर सहाय्यक निरीक्षक समाधान पाटील, भरत लिंगायत यांनी तपासचक्रे फिरवल्यावर घटनेच्या दिवशी (ता.२४) दुपारी मच्छिंद्र, मोहन ऊर्फ प्यारेमोहन व गुड्डू हे गोपाळ देविदास बटूंगे असे दारूच्या बाटल्या घेऊन मेहरुण तलावाकडे गेले होते, अशी माहिती जयसिंग भागवत पाटील यांच्याकडून पोलिसांना मिळाली. त्यावरून चौथ्या दिवशी मच्छिंद्र तुकाराम नाथ (वय २३), मोहन ऊर्फ प्यारेमोहन चंद्रकांत जाधव (वय १९) व गुड्डू ऊर्फ कानशा वहाब शेख (वय २२) या तिघांना अटक केली.

...यांना झाली शिक्षा 
न्या. पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात कामकाज होऊन या प्रकरणात गोपाळ बाटूंगे, जयसिंग पाटील, जितेंद्र गायकवाड, डॉ. विजय कुरकुरे, तपासाधिकारी समाधान पाटील यांच्यासह ११ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, परिस्थितीजन्य पुरावे लक्षात घेत न्या. लाडेकर  यांच्या न्यायालयाने प्यारेमोहन व गुड्डू यांना जन्मठेप व  ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली असून, तिसरा संशयित मच्छिंद्रला संशयाचा फायदा मिळत त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. केतन ढाके यांनी कामकाज पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com