पुजारी टोळीतील तिघांना जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

खंडणी न दिल्याबद्दल कुख्यात रवी पुजारीच्या टोळीने बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात गोळीबार करून प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघांना मोका अन्वये जन्मठेप व प्रत्येकी 15 लाख रुपयांचा दंड, तर चौथ्या आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरी व दहा लाख रुपये दंडाची शिक्षा नाशिकच्या विशेष मोका न्यायालयाने ठोठावली.

नाशिक - खंडणी न दिल्याबद्दल कुख्यात रवी पुजारीच्या टोळीने बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात गोळीबार करून प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघांना मोका अन्वये जन्मठेप व प्रत्येकी 15 लाख रुपयांचा दंड, तर चौथ्या आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरी व दहा लाख रुपये दंडाची शिक्षा नाशिकच्या विशेष मोका न्यायालयाने ठोठावली.

आरोपी संजय सिंग ऊर्फ संजय सीताराम डोलकर ऊर्फ संजय थापा ऊर्फ संजय नेपाळी ऊर्फ पीटर, अरविंद चव्हाण ऊर्फ चिंटू, विकासकुमार सिंग (तिघेही रा. मुंबई) यांना खंडणी, प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात मोका अन्वये दोषी ठरविण्यात येऊन जन्मठेप ठोठावण्यात आली. चौथा आरोपी संदीप रामाश्रय शर्मा ऊर्फ संदीप भय्या यास मोकाअन्वये सक्तमजुरीची शिक्षा विशेष मोका न्यायालयाच्या न्यायाधीश यू. एम. नंदेश्‍वर यांनी सुनावली. तसेच सर्व आरोपींना एकूण 55 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

या गुन्ह्याचा मुख्य आरोपी रवी पुजारी आहे. एकता एम्पायरचे अशोक मोहनानी यांना रवी पुजारी टोळीकडून खंडणीसाठी धमकावले जात होते. खंडणी न मिळाल्याने आरोपी अरविंद चव्हाण, विकासकुमार सिंग यांनी एकता एम्पायरच्या कार्यालयात पाकीट देण्याच्या बहाण्याने घुसून गोळीबार केला. यात कार्यालयातील कर्मचारी देविका कोडिलकर, रणजित आहेर हे जखमी झाले होते. गुन्ह्यात संजय सिंग याचा प्रत्यक्ष सहभाग होता तर, संदीप शर्माने शस्त्र पुरविले होते. यात मुंबई पोलिसांनी चौघांना अटक करून मोकाअन्वये दोषारोपपत्र सादर केले होते.

या खटल्याचे कामकाज 2014 पासून विशेष मोका न्यायालयाच्या न्यायाधीश यू. एम. नंदेश्‍वर यांच्यासमोर सुरू होते. विशेष सरकारी वकील ऍड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी 49 साक्षीदार तपासले.

पुजारी टोळीतील आरोपींना विशेष मोका न्यायालयाने जबर शिक्षा ठोठावली आहे. पोलिसांनी केलेला तपास आणि साक्षीदारांची साक्ष यामुळे आरोपींविरोधात गुन्हा शाबित होऊ शकला.
- ऍड. डॉ. सुधीर कोतवाल, विशेष सरकारी वकील.

Web Title: Life imprisonment Pujari Gang Member Crime Punishment