साहित्यिक, प्रवचनकारांनी मते मागून बघावीत - रामराजे नाईक निंबाळकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

राहाता - ‘राजघराण्यात जन्माला आलो; मात्र जन्मलो त्याच दिवशी आमचे संस्थान खालसा झाले. काही दिवस शिक्षक होतो. नंतर राजकारणात आलो. तत्त्वज्ञान, वादविवाद सर्व ठीक आहे. साहित्यिक आणि प्रवचनकारांनी आमच्यासारखी मते एकदा मागून बघावीत. मग खरे काय ते कळेल. राजकारणात आल्यापासून मला साहित्यिक वादविवाद आणि वाचन करावेसे वाटत नाही. कारण एक राजकारणी म्हणून मला दोन्ही बाजू आपल्याच वाटतात,‘‘ अशा शब्दांत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी साहित्यिक, त्यांचे वाद आणि राजकारणी यांच्यातील फरक विशद केला.

प्रवरानगर येथे पद्‌मश्री विठ्ठलराव विखे पाटील जयंती समारंभात ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस या वेळी उपस्थित होते. या वेळी विखे साहित्य पुरस्काराने सन्मानित केलेल्या साहित्यिकांनी ब्राह्मण्यवाद, आविष्कारस्वातंत्र्याचा संकोच, साहित्य समीक्षा पूर्वी कोण करायचे, आता कोण करीत आहे; तसेच सांस्कृतिक सत्ता या मुद्द्यांवर चर्चा केली. निंबाळकर यांनी शेतकरी व ग्रामीण भागासमोरील प्रश्‍नांचा ऊहापोह केला. त्यावर साहित्यिकांमध्ये विचारमंथन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करून ते म्हणाले, की गोदावरी पाणीवाटप कराराचा लवादाचा निर्णय सर्वोच्च न्यायालय रद्दबातल ठरवते. विदर्भात पाऊस बेभरवशाचा झाला. शेती कोलमडली. व्यसनांचा विळखा पडला. शेतकरी आत्महत्या करू लागले. अशा अनेक समस्या उभ्या आहेत. विधान परिषदेचा सभापती असल्याने माझ्या बोलण्यावर मर्यादा आहेत, अशी खंतही निंबाळकर यांनी व्यक्त केली.

कोण काय म्हणाले...
आविष्कारस्वातंत्र्याचा संकोच - डॉ. वाघमारे
जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित साहित्यिक व माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे म्हणाले, ‘सध्या आविष्कारस्वातंत्र्याचा संकोच होतो आहे. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे व कलबुर्गी यांच्यासारख्या समाजसुधारकांच्या हत्या त्यातूनच झाल्या. लेखकाला आविष्कारस्वातंत्र्य मिळाले पाहिजे. बहुजन समाजातील लेखकांनी महात्मा फुल्यांचा वारसा जपला पाहिजे.‘‘

समीक्षा क्षेत्रातही बहुजनांचा दबदबा - डॉ. कसबे
ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले, ‘सर्व सत्तास्थाने असलेल्या बहुजन समाजाकडे पूर्वी सांस्कृतिक सत्ता नव्हती; मात्र आता बहुजन समाज साहित्य समीक्षेच्या क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण करीत आहेत. ब्राह्मण्यवादाच्या विरोधात कार्य करणारे प्रवचनकार रामदास महाराज कैकाडी यांना यंदा विखे पुरस्कार देण्यात आला आहे.‘‘

समर्थ रामदासांचा ब्राह्मण्यवाद अमान्य - डॉ. सबनीस
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘समर्थ रामदासांचे "मनाचे श्‍लोक‘ मला मान्य आहेत; मात्र त्यांनी मांडलेला ब्राह्मण्यवाद मान्य नाही. वारकरी संप्रदायाने कधीही जातीपातीचा विचार केला नाही. त्यामुळे संतांचा जातीनिहाय विचार करणे योग्य ठरणार नाही. पद्‌मश्री विखे पाटील यांनीही कधी ब्राह्मणांचा द्वेष केला नाही.‘‘ 

Web Title: Literature, baghavita up votes pravacanakara - Ramraje naik nimbalkar