फरसाण व्यावसायिकाचा चिमुरडीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

परिसरात हे वृत्त पसरताच मुलीचे नातेवाईक व नागरिक बिटको रुग्णालयात जमले. या वेळी पोलिसांनी उपस्थितांना समजावून सांगितले व तणाव कमी केला. त्यानंतर आज सकाळी पीडित मुलीचे नातेवाईक व नागरिकांनी मोर्चाद्वारे पोलिस ठाण्यात येऊन झंवर याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करत रास्ता रोकोचा प्रयत्न केला

नाशिक रोड - ओढा मार्ग भागातील एका फरसाण व्यावसायिकाने त्याच्याच कारखान्यातील कामगाराच्या चारवर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधित व्यावसायिकाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पीडित मुलीचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून, संशयितावर कठोर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

सुभाष प्रकाशचंद झंवर (वय 51, रा. वृंदावन अपार्टमेंट, ओढा रोड) असे या व्यावसायिकाचे नाव असून, त्याचा एकलहरा मार्ग परिसरात अरिंगळे मळा येथे फरसाण बनविण्याचा कारखाना आहे. बुधवारी (ता. 10) त्याने कारखान्यातील एका कर्मचाऱ्याच्या चार वर्षांच्या मुलीला बाहेर बोलविले. तत्पूर्वी त्याने घरातील अन्य मुलांनाही आइस्क्रीम घेऊन देतो, असे सांगितले होते. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास त्याने पीडित मुलीला घरी सोडले. मात्र, काही वेळातच ती चक्कर येऊन खाली पडली. तिच्या आईने विचारपूस केली तेव्हा ती मुलगी खूप घाबरलेली होती. तिच्या गालावर काही जखमा असल्याचे आईच्या लक्षात आले. त्यामुळे तिच्या सर्व शरीराची तपासणी केली असता अंगावर कोणीतरी चावल्याच्या जखमा दिसून आल्या. त्यामुळे घाबरलेल्या मुलीच्या आईने घरमालकिणीला बोलवून सर्व हकीगत सांगितली. त्यांनी तातडीने मुलीच्या वडिलांनाही कळविले. घरी आल्यावर हा प्रकार पाहून त्यांना धक्काच बसला. तशाही अवस्थेत मुलीच्या आई-वडिलांनी सुभाष झंवर याला गाठले व या प्रकाराचा जाब विचारला. त्यावर त्याने "माझ्यावर खोटे आरोप करू नका, मी काही केलेले नाही' असे उडवाउडवीचे उत्तर दिले व पाहुणे आल्याचे सांगून तेथून पळ काढला. मुलीचे आई-वडील तिला दवाखान्यात नेत असताना संशियत झंवर पुन्हा घरी आला व त्याने "आपण माझ्या ओळखीच्या खासगी दवाखान्यात मुलीला नेऊ,' असे सुचविले. मात्र, मुलीच्या वडिलांनी नकार देत तिला महापालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्यासह अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, परिसरात हे वृत्त पसरताच मुलीचे नातेवाईक व नागरिक बिटको रुग्णालयात जमले. या वेळी पोलिसांनी उपस्थितांना समजावून सांगितले व तणाव कमी केला. त्यानंतर आज सकाळी पीडित मुलीचे नातेवाईक व नागरिकांनी मोर्चाद्वारे पोलिस ठाण्यात येऊन झंवर याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करत रास्ता रोकोचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्यांची समजूत काढून घरी पाठविले; परंतु नागरिकांच्या मनात प्रचंड राग असल्याने त्यांनी फरसाण कंपनीवर हल्ला केला.

Web Title: little girl abused physically