कर्जमुक्तीची श्‍वेतपत्रिका काढा - अरुणभाई गुजराथी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

जळगाव - वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस देत आहेत. त्यांच्या आशेवर आजही शेतकरी आहे. मात्र, त्यांची वेळ कधी येईल हे माहीत नाही. त्यांची वेळ येईल तेव्हा येईल, परंतु कर्जमुक्ती कशी करणार यांची श्‍वेतपत्रिका तरी शासनाने त्वरित काढावी, अशी मागणी माजी वित्त व नियोजन मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी यांनी आज येथे केली.

जिल्हा बॅंकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरित दिले जावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने आज जिल्हा बॅंकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांना आज निवेदन दिले. त्यानंतर श्री. गुजराथी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

श्री. गुजराथी म्हणाले, की मुख्यमंत्री नेहमी म्हणतात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करू म्हणतात, पण निर्णय होत नाही. आता शेतीचा हंगाम आला आहे. कर्जमुक्तीच्या आशेवर शेतकरी बॅंकेचा थकबाकीदार झाला आहे. त्याला कर्ज मिळत नाही. शेती तयार करण्यासाठी पैसा नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे आता शासनाने कर्जमुक्तीचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची कर्जमुक्तीची वेळ येईल तेव्हा येईल, पण तूर्तास त्यांनी कर्जमुक्तीबाबत श्‍वेतपत्रिका तरी काढावी. कर्जमुक्ती कशी करणार, किती लाखांपर्यंत करणार याची सविस्तर माहिती श्‍वेतपत्रिकेत द्यावी. यामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची खऱ्या अर्थाने हमी मिळेल.

चार दिवसात रोख कर्ज द्या
जिल्ह्यातील शेतकरी पैशाअभावी हवालदिल झाला आहे. त्याला चार दिवसात रोख रकमेत कर्ज उपलब्ध करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला. शेतीचा हंगाम जवळ आलेला असतानाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप कर्ज उपलब्ध झालेले नाही. जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांना किसान रुपी कार्ड दिले. परंतु त्यांचा फारसा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. त्यामुळे रोख रकमेच्या स्वरूपात बॅंकेतून कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी पक्षातर्फे बॅंकेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, माजी आमदार अरुण पाटील, राजीव देशमुख, जिल्हा बॅंक संचालक संजय पवार, अनिल भाईदास पाटील, विकास पवार आदी उपस्थित होते.

Web Title: loan free ration card