आव्हाणेत वाळूमाफियांविरुद्ध ग्रामस्थांचा उद्रेक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

जळगाव - अधिकृतरीत्या वाळू ठेके बंद असताना आव्हाणी (ता. जळगाव) येथील गिरणेच्या पात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. मात्र, महसूल प्रशासन दिवाळी सुटीचा आनंद उपभोगत असताना वाळूमाफियांनी अक्षरश: रान माजवले आहे. आव्हाणे (ता. जळगाव) येथे रात्रीतून शेतरस्ता खोदून वाळूचोरट्यांनी शेतात जाण्यासाठीचा गावसंपर्क तोडून टाकल्याने मात्र ग्रामस्थांचा संताप झाला. रात्रभरापासून वाळू उत्खनन करत असणाऱ्यांना विरोध केल्याने वाद वाढत जाऊन एका शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आव्हाणे येथील शेतकरी जगदीश चौधरी बैलगाडीत साहित्य व मजूर घेऊन नदीकडेला असलेल्या शेतात जाण्यासाठी निघाले असता वाळू व्यावसायिकांनी शेतरस्ता खोदून मोठी दरी केल्याचे त्यांना आढळून आले. वाळू डंपरसह (एमएच 19 -2313) आणखी एक डंपर या ठिकाणाहून सकाळी आठलाही उत्खनन करत असल्याने जगदीशने त्यांना विचारणा करीत ग्रामस्थांनी शेतात कोठून जायचे, असा प्रश्‍न केला. यावर डंपरचालकाने शिवीगाळ करीत याच खड्ड्यात गाडून टाकण्याची धमकी दिली.

शेतीकामाची लगबग सुरू असताना शेतरस्ता खोदून काढल्याने जगदीशने गावात जाऊन पदाधिकारी, ग्रामस्थांना सांगितल्यावर त्यांनी धाव घेत वाळू उत्खनन करणारे डंपर अडवून ठेवत पोलिस व महसूल विभागाला फोनवरून घटनेची माहिती दिली. सकाळी आठची घटना असल्याने प्रशासनाचे कुणीही वेळीच पोहोचू शकले नाही. परिणामी, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना फोन केल्यावर निरीक्षकांसह पोलिस कुमक दाखल झाली. जगदीश चौधरी यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिसांत दमदाटी, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.

रात्रीतून रस्ता गायब
मध्यरात्री वाळूमाफियांचा दिवस उजाडतो. आव्हाणेतील ग्रामस्थांच्या कायम वापराचा रस्ता रात्रीतून वाळूमाफियांनी खोदून दरी निर्माण केली. अवघ्या काही तासांत मोठ्ठा खड्डा निर्माण होऊन शेतकऱ्यांचा गावाशी असलेला संपर्क पूर्णत: तुटला. त्यामुळे सकाळी शेताकडे निघालेल्या शेतकऱ्यांना जाण्यासाठी त्रास होत असल्याने वादाला सुरवात झाली.

आव्हाणी येथून रोजच बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. आव्हाणी येथून वाळू चोरून ती आव्हाणेमार्गे नेण्यात येते. ग्रामस्थांचा विरोध असूनही वाळूमाफिया जुमानत नाहीत. आव्हाणेतील नदीपात्र पूर्णत: खोदून काढले आहे. नदीपात्रात 30-40 फूट खोल खड्डे तयार झाले असून, मागील वर्षी एका शेतकऱ्याचा याच डोहात बुडून मृत्यू झाला. त्यापूर्वी तीन तरुण गणेश विसर्जनावेळी बुडाले. लोकांच्या जिवावर वाळूचोरटे उठले असताना त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने आता उग्र आंदोलन छेडण्याचा निर्धार आव्हाणेकरांनी केला आहे.
- हर्षल चौधरी, ग्रामपंचायत सदस्य

Web Title: Locals protested against Sand Mafia in Avhane