नंदूरबारमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता दोन दिवस कडकडीत बंद 

नंदूरबारमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता दोन दिवस कडकडीत बंद 

नंदुरबार : लॉकडाउनच्या दुसऱ्या दिवशीही नाशवंत वस्तू विक्रेत्यांसह जिल्हाधिकारींचा आदेशानुसार लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शहरात फिरून लॉकडाउनच्या अंमलबजावणीबाबत पाहणी करत नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले. तसेच आठवड्यातून दोन दिवस शनिवार व रविवारचा जनता कर्फ्यू नियमित ठेवत आरोग्य सेवा वगळता सर्वांसाठी कडकडीत बंद असणार आहेत. 

लॉकडाउनपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी आठवड्याचा दर शनिवार व रविवारी आरोग्य सेवा वगळता कडकडीत जनता कर्फ्यू लागू केला आहे. तो कायम ठेवत गुरुवार (ता.१) पासून १५ दिवसांचे लॉकडाउन सुरू झाले आहे. गुरुवारी पहिल्या दिवशी अनेक व्यापारी, व्यावसायिकांनी नेहमीप्रमाणे दुपारी एकपर्यंत प्रतिष्ठाने सुरू ठेवली होती. त्यामुळे लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. मात्र शुक्रवारी (ता.२) दुसऱ्या दिवशी लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा शहरभर फिरला. ठिकठिकाणी लावलेल्या बॅरिकेटसची पाहणी केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशात नमूद विक्रेत्यांचेच दुकाने उघडले आहेत की इतर वयावसयिकांनीही उघडले आहेत, याची पाहणी केली. 


आदेशानुसार भाजीपाला, फळे, शेतीमाल, दूध, वृत्तपत्र विक्रेते, रेस्टॉरंट हे ठरवून दिलेल्या वेळेत आपले व्यवसाय करत होते. दरम्यान, विना मास्क असलेले व्यापारी, व्यावसायिक, नागरिक यांच्यासह विनाकारण फिरणाऱ्यांनाही पोलिस अधिक्षक श्री. पंडित व पोलिस निरीक्षक श्री. कळमकर यांनी तंबी दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी कोरोनाचा उद्रेक पाहता लॉकडाउन कमी जास्त प्रमाणात सुरू राहील, मात्र आठवड्यातून दोन दिवस शनिवार व रविवार असे दोन दिवसाचा जनता कर्फ्यू नियमित ठेवत आरोग्य सेवा वगळता सर्वासाठी कडकडीत बंद असल्याचा आदेश यापूर्वी दिला आहे. त्यानुसार उद्याचा शनिवार व रविवार असे दोन दिवस दुपारी एक पर्यंतची मुभा नसणार आहे. त्यामुळे हॉस्पिटल, दूध, वृत्तपत्रे वगळता कडकडीत बंद पाळणार आहे. नियमांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com