Loksabha 2019 : पाचोऱ्यात भाजप-शिवसेना मनोमिलनाचे आव्हान

Loksabha 2019 : पाचोऱ्यात भाजप-शिवसेना मनोमिलनाचे आव्हान

पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाला पाचोरा, भडगाव व जामनेर या तीन तालुक्यांचा स्पर्श झाला आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर पाचोरा तालुक्यातील लोहारा- कुऱ्हाड जिल्हा परिषदेचा गट जामनेर विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आला. भडगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे गट पाचोरा मतदारसंघाला जोडले गेले आहेत. त्यामुळे या तीनही तालुक्यातील घडामोडींचा परिणाम पाचोरा तालुक्याच्या राजकारणावर जाणवत असतो. 

२००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आर. ओ. पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वाघ यांनी पराभूत केले होते. तर २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे किशोर पाटील यांनी दिलीप वाघ यांचा पराभव करून विधानसभा गाठली. (कै.) के. एम. (बापू) पाटील व (कै.) ओंकार (आप्पा) वाघ यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघाने आलटून पालटून वेगवेगळ्या उमेदवारांना प्रतिनिधित्व दिले आहे. गतकाळात आर. ओ. पाटील यांनी सलग दोनदा विजय मिळविला होता. त्यामुळे आता या इतिहासाची पुनरावृत्ती शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर पाटील करणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील खासदार ठरविणारा तालुका अशीही पाचोरा तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे. पाचोरा विधानसभा मतदारसंघात पाचोरा तालुक्यातील ८५ व भडगाव तालुक्यातील ४७ अशी १३२ गावे असून ३ लाख ७ हजार ५७० मतदार आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वाधिक सैनिक मतदारांची संख्या पाचोरा मतदारसंघात आहे. 

असे आहे बलाबल 
शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा व भडगाव पालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित केले. बाजार समितीही ताब्यात घेतली. मात्र, नंतरच्या काळात पंचायत समिती, शेतकरी संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप व राष्ट्रवादीने एकत्र येऊन शिवसेनेपुढे आव्हान उभे करून सत्ता मिळवली आहे. बहुतांश ग्रामपंचायती व विकास सोसायट्या देखील शिवसेनेच्या वर्चस्वात आहेत. पाचोरा तालुक्यात जिल्हा परिषदेचे ५ गट व पंचायत समितीचे १० गण आहेत. पंचायत समितीत काँग्रेसच्या एकमेव सदस्याच्या पाठिंब्याने भाजपने सत्ता प्रस्थापित केली आहे. पालिकेत सत्ताधारी शिवसेनेला राष्ट्रवादीने विकासासाठी पाठिंबा दिला आहे. बाजार समितीत भाजप व राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता प्रस्थापित केली आहे. मोदी लाटेमुळे पाच वर्षांपासून भाजपने विविध स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपली सत्ता प्रस्थापित केली. शिवसेना-भाजपा युती असली तरी गेल्या लोकसभा निवडणुकीप्रसंगी खासदार ए. टी. पाटील व आमदार किशोर पाटील यांच्यात वादाची ठिणगी पडली, जी आजतागायत धगधगत आहे. आमदार किशोर पाटील यांनी खासदार ए. टी. पाटील व मंत्री गिरीश महाजन यांच्यावर बोचरी टीका करण्याची एकही संधी  सोडलेली नाही. एवढेच नव्हे तर मंत्री महाजनांनी माझ्या विरोधात उमेदवार शोधण्यात वेळ व पैसा वाया घालवण्यापेक्षा स्वतः उभे राहावे व अजमावून घ्यावे. खासदार पाटील व मंत्री महाजन यांनी जनतेसमोर येऊन आपण केलेल्या विकासकामांचे स्पष्टीकरण द्यावे, हे असे खुले आव्हानही आमदारांनी जाहीरपणे दोघांना अनेकवेळा दिले आहे. 

पाचोरा विधानसभा मतदारसंघात आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात मंत्री महाजनांनी भाजपच्या काही इच्छुकांना दिलेला ऑक्सिजन व जामनेर मतदारसंघात शिवसेनेचे दीपकसिंह राजपूत यांनी चालवलेली तयारी यामुळे शिवसेना- भाजपतील ‘तू तू- मै मै’ सातत्याने वाढत गेली आहे. युती होणार नाही या विचारातून भाजपच्या इच्छुकांनी तयारी चालवून शिवसेनेला आव्हान दिले. अशा विविधांगी कारणांमुळे दोघांतील वाद वाढतच गेला आहे. पाणीटंचाई आढावा बैठकीच्या कारणावरून शिवसेना व भाजप पदाधिकाऱ्यांत निर्माण झालेला वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोचला आणि शिवसेनेच्या १३ प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. त्याप्रकरणी तारीख पे तारीख सुरू असताना युतीचा निर्णय झाला. त्यामुळे दोन्ही पक्षांचे पदाधिकारी कमालीचे संभ्रमात पडले आहेत. 

परस्परांविरुद्ध डरकाळ्या 
युती झाली तरी विधानसभेसाठी भाजपचा स्वतंत्र उमेदवार असेल असे स्पष्टीकरण भाजपचे राज्य परिषद सदस्य डी. एम. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले तर दुसरीकडे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ॲड. दिनकर देवरे यांनी भाजपने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारी व गुन्हे प्रथम मागे घ्यावेत, त्यानंतरच भाजप उमेदवाराच्या प्रचाराचा विषय होईल, असे पत्रक प्रसिद्ध केले. लोकसभा निवडणुकीत भाजपला विजयाचे फटाके फोडता येणार नाहीत, असा एकमुखी ठराव शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे. या परस्पर विरोधी डरकाळ्यांमुळे युती धर्माबाबतची संभ्रमावस्था कमालीची वाढली आहे. 

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे विद्यमान आमदार किशोर पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला माजी आमदार दिलीप वाघ यांच्याशिवाय पर्याय नाही. दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली तरी आघाडीतही काही प्रमाणात बिघाडी आहे. दुसरीकडे शिवसेना-भाजपतील विकोपाला गेलेली ओढाताण मनोमिलनापर्यंत कशी पोहोचेल? हा प्रश्न आहे. इच्छुकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. पक्षांतर्गत बंडखोरीही नाकारता येत नाही. शिवसेना- भाजपच्या स्थानिक पातळीवरील मनोमिलनासाठी कोण कशा पद्धतीने पावले टाकतात हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. 

मतदारसंघातील प्रश्न -
- रेल्वे मालधक्क्याचे स्थलांतर. 
- नदीजोड प्रकल्पाचे रखडलेले काम. 
- औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरण. 
- बंद पडलेल्या कारखान्यांचे पुनरुज्जीवन. 
- सिंचन प्रकल्पांच्या डाव्या-उजव्या कालव्यांची दुरुस्ती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com